द टी सी एस सक्सेस स्टोरी

प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक

दै.सकाळ, पुणे, शुक्रवार 12 एप्रिल 2013
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत; भारत हार्डवेअरमध्ये मागे. प्रत्येकाने वाचावे 'द टीसीएस सक्सेस स्टोरी' हे पुस्तक केवळ एका कंपनीची यशोगाथा नाही, तर देशातील संगणक युग, माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार व संगणक प्रणालीचा विकास, या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा त्यात आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. अन्य क्षेत्रातील वाचकांना ते भावणार आहे,' असेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 'आयबीएम' या कंपनीला भारतातून हाकलून देण्याचा जनता सरकारचा 1977 मधील निर्णय दुदैवी होता. त्यामुळे कॉम्प्युटर हार्डवेअर क्षेत्रात भारत कायमचाच मागे पडला असून, त्याचे परिणाम अद्याप भोगावे लागत आहेत. ही कंपनी भारतात असती तर हार्डवेअरबाबत तैवानलाही आपण मागे टाकू शकलो असतो,’’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. पंतप्रधानांच्या कौशल्य विकास अभियानाचे सल्लागार व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) उपाध्यक्ष एस. रामदोराई यांनी लिहिलेल्या 'द टीसीएस स्टोरी... अँड बियॉंण्ड' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुवर्णा बेडेकर यांनी मराठी अनुवाद केला असून, अमेय प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. चव्हाण म्हणाले, ‘‘टाटा उद्योगाने त्यांच्या समूहातील कंपन्यांसाठी 1968 मध्ये टीसीएसची स्थापना केली. त्याच दरम्यान भारतात माहिती तंत्रज्ञान युग सुरू झाले. मात्र 1973 मध्ये 'फेरा' कायद्यामुळे आयटी कंपन्यांच्या आयातीवर निर्बंध आले. त्याचाही परिणाम या क्षेत्रावर झाला. त्यापेक्षा मोठा फटका 'आयबीएम'ला भारतातून हाकलून देण्यामुळे बसला. या निर्णयामुळे हार्डवेअरच्या क्षेत्रात कायमस्वरूपी आपण मागे पडलो. केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे या क्षेत्राला आता प्रोत्साहन मिळत आहे.’’ रामदोराई म्हणाले, 'देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन होत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. टीसीएसने कायम सांघिक पद्धतीने काम केल्यामुळे जगभर या कंपनीचा लौकिक निर्माण झाला. तंत्रज्ञानात वेगाने झालेल्या बदलांची साक्षीदार टीसीएस असून, त्याचाही आढावा या पुस्तकात वाचकांना मिळणार आहे. कंपनीचे महाराष्ट्रात 59 हजार कर्मचारी असून, नजीकच्या काळात हिंजवडी प्रकल्पात वीस हजार कर्मचारी दाखल होणार आहेत. कौशल्य विकास अभियानात नाशिक, औंरगाबाद या शहरांना आगामी काळात मोलाचे स्थान असेल.' अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असून, आगामी काळात ते ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोचविण्यासाठी रामदोराई यांच्या मदतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रॉसवर्डचे सतीश गुप्ता हेही या प्रसंगी उपस्थित होते. फोटो ओळी - सेनापती बापट रस्ता - एस. रामदोराई यांनी लिहिलेल्या 'द टीसीएस सक्सेस स्टोरी... अँड बियॉंड' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी क्रॉसवर्डमध्ये झाले. या वेळी डावीकडे रामदोराई.

प्रवास जगाचा... जगण्याचा

मराठी पुस्तकाचे अंटार्क्टिकावर प्रकाशन

दै. सकाळ, पुणे, गुरुवार 26 जानेवारी 2012
केसरी टुर्सच्या संचालिका वीणा पाटील यांच्या 'प्रवास जगाचा जगण्याचा (भाग 3)' या पुस्तकाने बर्फमय खंडावर प्रकाशित होणाऱ्या जगातल्या पहिल्या पुस्तकाचा मान मिळवला आहे. अमेय प्रकाशनाच्या या पुस्तकाचे अंटार्क्टिकातील डिसेप्शन आयलंड या बेटावर झालेल्या समारंभात ऍडव्हेंचर टुरिझममधील क्वार्क एक्स्पिडीशनचे डेव्हिड वूडी आणि ऍनी इग्लिस यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी केसरी टुर्सचे सुधीर पाटील, केसरी पाटील, सुनीता पाटील उपस्थित होते. या पुस्तकात एका यशस्वी उद्योजिकतेची मानसिकता उलगडून दाखविली आहे. पर्यटकांना जगभरातील रमणीय स्थळांची सफर घडविताना, घर आणि व्यवसाय यांची सांगड घालताना जीवनप्रवास कसा रंगतदार होतो याचे अनुभव वीणा पाटील यांनी मांडले आहेत. फोटो ओळी - अंटार्क्टिकावर झालेल्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डेव्हिड वूडी, वीणा पाटील आणि ऍनी इग्लिसो

आहे लोकतंत्र तरीही

देशात खऱ्या अर्थाने लोकशाही नाही

 दै. सामना, सोमवार 4 जून 2012
राजकारणाचा पाया संकुचित होत असून 'मनी आणि मसल पॉवर'चा वापर करून निवडणूका लढविल्या जात आहेत. योग्यता नसणाऱ्या लोकांना निवडून देणारे नागरिकही तेवढेच या प्रकाराला जबाबदार आहेत. जनतेला लोकशाहीतील अधिकार हवे आहेत; कर्तव्ये नको आहेत. त्यामुळेच देशात अद्याप खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण झाली नाही, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. 'अमेय प्रकाशन'तर्फे आयोजित कार्यक्रमात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे लिखित 'आहे लोकतंत्र तरीही' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे,'म्हाडा'चे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे आणि कॉंग्रेसचे नेते अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी 'भारतीय लोकशाहीचे भवितव्य' या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आमदार डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उदासीनता आली आहे. पक्षात कामापेक्षा पैशाला महत्त्व देऊन प्रतिनिधींना निवडणुकांचे तिकीट वाटले जाते. लोकशाहीप्रणालीत सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेत प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा घोटाळ्यांवर चर्चा होते. यामुळे लोकशाहीची उपेक्षा होत आहे. अंकुश काकडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर लोकशाही पद्धत स्वीकारली असली, तरी राजकीय पक्षांमध्ये लोकशाही निर्माण झालेली नाही. लोकांना घटनेने दिलेले अधिकार हवे आहेत. मात्र, लोकशाहीची कर्तव्ये बजाविण्यासाठी ते पुढे येत नाहीत. अनंत गाडगीळ म्हणाले, लोकांनी नेता निवडताना जागरूक राहिले पाहिजे. देशात सतराशे साठ राजकीय पक्ष आहेत. मात्र, त्यामुळे कडबोळाचं राजकारण केले जात आहे. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, प्रश्न सोडविताना राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते. व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी जनशक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. फोटो ओळी 'अमेय प्रकाशन'तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. विनय सहस्रबुद्धे लिखित 'आहे लोकतंत्र तरीही' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, 'म्हाडा'चे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे आणि कॉंग्रेसचे नेते अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

क्रांती आणि हरितक्रांती

क्रांतिकारक खानखोजे यांचा जीवनपट उलगडला

दै. सकाळ, पुणे, मंगळवार, 8 नोव्हेंबर 2011
'क्रांती आणि हरितक्रांती'पुस्तकाचे प्रकाशन - पांडुरंग सदाशिव खानखोजे... वयाच्या अवघ्या सतरा-अठराव्या वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिका, जर्मनी, मेक्सिको आदी देशांमध्ये पडेल ते काम करून झगडणारा क्रांतिकारक. परंतु अद्यापही पडद्यामागेच राहिलेला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही वाट्याला आली ती उपेक्षाच. अशा क्रांतिकारकाचा जीवनपट 'क्रांती आणि हरित क्रांती' या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आला आहे. 'अमेय प्रकाशन'च्या वतीने मेक्सिकोचे भारतातील प्रतिनिधी कॉन्रॅडो टोस्टॅडो यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मूळ इंग्रजी भाषेतील या पुस्तकाच्या लेखिका डॉ. सावित्री साहनी असून, सुहास फडके यांनी मराठी अनुवाद केला आहे. परकीय भूमीवर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकाची कथा सांगणारे हे पुस्तक म्हणजे मेक्सिको आणि भारत यांच्यातील 'ग्लोबल फ्रेंडशिप' आहे, अशा गौरवपूर्ण शब्दात कॉन्रॅडो टोस्टॅडो यांनी या पुस्तकाचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'मेक्सिकोसाठीही कृषी क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले. एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.' खानखोजे यांचा लढा क्रांतिकारी असून, भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुस्तकास शुभेच्छा दिल्या. पांडुरंग खानखोजे यांची मुलगी आणि मूळ इंग्रजी भाषेतील या पुस्तकाची लेखिका डॉ. सावित्री सहानी यांनीही आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या. राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी या पुस्तकाच्या मराठी भाषांतरासाठी मोठे सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.