प्रवास जगाचा... जगण्याचा

मराठी पुस्तकाचे अंटार्क्टिकावर प्रकाशन

दै. सकाळ, पुणे, गुरुवार 26 जानेवारी 2012
केसरी टुर्सच्या संचालिका वीणा पाटील यांच्या 'प्रवास जगाचा जगण्याचा (भाग 3)' या पुस्तकाने बर्फमय खंडावर प्रकाशित होणाऱ्या जगातल्या पहिल्या पुस्तकाचा मान मिळवला आहे. अमेय प्रकाशनाच्या या पुस्तकाचे अंटार्क्टिकातील डिसेप्शन आयलंड या बेटावर झालेल्या समारंभात ऍडव्हेंचर टुरिझममधील क्वार्क एक्स्पिडीशनचे डेव्हिड वूडी आणि ऍनी इग्लिस यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी केसरी टुर्सचे सुधीर पाटील, केसरी पाटील, सुनीता पाटील उपस्थित होते. या पुस्तकात एका यशस्वी उद्योजिकतेची मानसिकता उलगडून दाखविली आहे. पर्यटकांना जगभरातील रमणीय स्थळांची सफर घडविताना, घर आणि व्यवसाय यांची सांगड घालताना जीवनप्रवास कसा रंगतदार होतो याचे अनुभव वीणा पाटील यांनी मांडले आहेत. फोटो ओळी - अंटार्क्टिकावर झालेल्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डेव्हिड वूडी, वीणा पाटील आणि ऍनी इग्लिसो

आहे लोकतंत्र तरीही

देशात खऱ्या अर्थाने लोकशाही नाही

 दै. सामना, सोमवार 4 जून 2012
राजकारणाचा पाया संकुचित होत असून 'मनी आणि मसल पॉवर'चा वापर करून निवडणूका लढविल्या जात आहेत. योग्यता नसणाऱ्या लोकांना निवडून देणारे नागरिकही तेवढेच या प्रकाराला जबाबदार आहेत. जनतेला लोकशाहीतील अधिकार हवे आहेत; कर्तव्ये नको आहेत. त्यामुळेच देशात अद्याप खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण झाली नाही, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. 'अमेय प्रकाशन'तर्फे आयोजित कार्यक्रमात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे लिखित 'आहे लोकतंत्र तरीही' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे,'म्हाडा'चे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे आणि कॉंग्रेसचे नेते अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी 'भारतीय लोकशाहीचे भवितव्य' या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आमदार डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उदासीनता आली आहे. पक्षात कामापेक्षा पैशाला महत्त्व देऊन प्रतिनिधींना निवडणुकांचे तिकीट वाटले जाते. लोकशाहीप्रणालीत सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेत प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा घोटाळ्यांवर चर्चा होते. यामुळे लोकशाहीची उपेक्षा होत आहे. अंकुश काकडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर लोकशाही पद्धत स्वीकारली असली, तरी राजकीय पक्षांमध्ये लोकशाही निर्माण झालेली नाही. लोकांना घटनेने दिलेले अधिकार हवे आहेत. मात्र, लोकशाहीची कर्तव्ये बजाविण्यासाठी ते पुढे येत नाहीत. अनंत गाडगीळ म्हणाले, लोकांनी नेता निवडताना जागरूक राहिले पाहिजे. देशात सतराशे साठ राजकीय पक्ष आहेत. मात्र, त्यामुळे कडबोळाचं राजकारण केले जात आहे. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, प्रश्न सोडविताना राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते. व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी जनशक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. फोटो ओळी 'अमेय प्रकाशन'तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. विनय सहस्रबुद्धे लिखित 'आहे लोकतंत्र तरीही' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, 'म्हाडा'चे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे आणि कॉंग्रेसचे नेते अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

क्रांती आणि हरितक्रांती

क्रांतिकारक खानखोजे यांचा जीवनपट उलगडला

दै. सकाळ, पुणे, मंगळवार, 8 नोव्हेंबर 2011
'क्रांती आणि हरितक्रांती'पुस्तकाचे प्रकाशन - पांडुरंग सदाशिव खानखोजे... वयाच्या अवघ्या सतरा-अठराव्या वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिका, जर्मनी, मेक्सिको आदी देशांमध्ये पडेल ते काम करून झगडणारा क्रांतिकारक. परंतु अद्यापही पडद्यामागेच राहिलेला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही वाट्याला आली ती उपेक्षाच. अशा क्रांतिकारकाचा जीवनपट 'क्रांती आणि हरित क्रांती' या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आला आहे. 'अमेय प्रकाशन'च्या वतीने मेक्सिकोचे भारतातील प्रतिनिधी कॉन्रॅडो टोस्टॅडो यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मूळ इंग्रजी भाषेतील या पुस्तकाच्या लेखिका डॉ. सावित्री साहनी असून, सुहास फडके यांनी मराठी अनुवाद केला आहे. परकीय भूमीवर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकाची कथा सांगणारे हे पुस्तक म्हणजे मेक्सिको आणि भारत यांच्यातील 'ग्लोबल फ्रेंडशिप' आहे, अशा गौरवपूर्ण शब्दात कॉन्रॅडो टोस्टॅडो यांनी या पुस्तकाचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'मेक्सिकोसाठीही कृषी क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले. एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.' खानखोजे यांचा लढा क्रांतिकारी असून, भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुस्तकास शुभेच्छा दिल्या. पांडुरंग खानखोजे यांची मुलगी आणि मूळ इंग्रजी भाषेतील या पुस्तकाची लेखिका डॉ. सावित्री सहानी यांनीही आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या. राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी या पुस्तकाच्या मराठी भाषांतरासाठी मोठे सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

मिशन काश्मीर

स्कार्दूचा वेढा

दै. सामना, साहित्य विश्व, रविवार, 20 जून 2010
 ‘काश्मीर'च्या इतिहासाचा व स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळातील तेथील राजकीय घडामोडींचा नव्याने वेध घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी यांनी लिहिलेल्या ‘मिशन काश्मीर' या अमेय प्रकाशन प्रसिद्ध करीत असलेल्या आगामी पुस्तकातील काही निवडक भाग. 23 जून रोजी प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. 1948 साली तब्बल 431 दिवस चालेलल्या यृद्धाची रोमहर्षक कहाणी, काश्मीर वाचविण्यासाठी प्राणपणाने लढलेले, प्राणांची आहुती दिलेले अनेक ज्ञात-अज्ञात वीर यांची कहाणी सांगत असतानाच काश्मीर प्रश्न धोरणकर्त्यांनी कसा चिघळवला, दहशतवादाची पाळंमुळं तिथं कशी रुजली याचा अस्वस्थ करून टाकणारा तपशील कथन करणारे हे ‘मिशन काश्मीर!' लेफ्ट. कर्नल थापा यांच्या संदेशानंतर 11 एप्रिल रोजी 163, ब्रिगेडने मेजर काउटसला तातडीने स्कार्दूकडे जाण्याचा आदेश दिला. यानंतर श्रीनगरहून निघालेली पहिली तुकडी कारगिलमध्ये प्रवेश करत होती. दुसरी तुकडी द्रासजवळ होती. तिसरी मटायनजवळ तर चौथी व पाचवी घुमरीजवळ होती आणि सहावी तुकडी श्रीनगरहून निघण्याच्या तयारीत होती. स्कार्दूकडे जाणाऱ्या या तुकड्यांच्या दोघा अधिकाऱ्यांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले. मेजर काउटस व लेफ्ट. कर्नल कृपालसिंग यांच्यातील मतभेदानंतर स्कार्दू वाचविण्याच्या मोहिमेची जबाबदारी कृपालसिंगकडे सोपविण्यात आली. मधल्या काळात स्कार्दू तळाची स्थिती खालावत होती. तळावरील दारूगोळा, औषधे यांचा साठा संपत आला होता. लेफ्ट. कर्नल थापाने स्कार्दूची मोर्चे बांधणी बळकट केली होती. स्कार्दूचा तळ 1350 मीटर लांब तर 550 मीटर रूंद होता. थापाने या तळाकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गाला रोखून धरता येतील अशा प्रकारे तळावरील मोर्चे लावले होते. तळावरील बंकर खोल होते. त्याच्या छतावर भरपूर माती टाकून शत्रूचा उखळी तोफांचा मारा निष्प्रभ करण्याचा प्रयत्न थापाने केला होता. थापाची मुख्य अडचण दारूगोळ्याची होती. तळावरील मर्यादित दारूगोळा विचारात घेऊन त्याला मर्यादित वापर करावा लागत होता. श्रीनगरमध्ये डिव्हिजन मुख्यालयात असलेल्या मेजर जनरल थिमय्या यांना स्कार्दूतील परिस्थितीची कल्पना आली. त्यांनी स्कार्दूवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. स्कार्दू तर गेले आता कारगिल तरी वाचवावे असा निर्णय थिमय्यांनी घेतला. तसा आदेश त्यांनी जरी केला. थापाने स्कार्दूतून बाहेर पडून मरोलकडे कूच करावे. तेथे त्याला लेफ्ट. कर्नल कृपालसिंगने भेटावे असा आदेश जारी झाला. स्कार्दूतून बाहेर पडून 128 कि.मी. वरील मरोलला जाणे अशक्य आहे, कृपालसिंगनेच स्कार्दूत यावे, असे थापा सांगत होते. तर कृपाल सिंगला हे शक्य नव्हते. थापा श्रीनगरकडे रसद-दारूगोळा मागत होता; पण त्याला मिळत होती फक्त आश्वसाने. दरम्यान कृपालसिंगचेही पथक उद्ध्वस्त झाल्याची बातमी स्कार्दूत पोहोचली आणि थापा व त्याच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. 17 जून रोजी घुसखोरांनी थापाकडे शरण येण्याचा संदेश पाठविला. जम्मू-काश्मीर इन्फन्ट्रीचा शिपाई अमरनाथसोबत कर्नल शहजादने हा संदेश पाठविला होता. घुसखोरांनी अमरनाथला पारकुट्टात पकडले होते. हा संदेश थापाने फेटाळून लावला. दोन दिवसांनी 19 जून रोजी रॉयल भारतीय वायुदलाची दोन टेंपेस्ट विमाने स्कार्दूच्या आकाशात दिसली. दुसऱ्या दिवशीही या विमानांनी घुसखोरांवर पुन्हा हल्ला चढविला. यामुळे स्कार्दूत उत्साह संचारला. पण तो फार काळ टिकला नाही. कारण त्यानंतर दोन आठवडे काहीच झाले नाही आणि स्कार्दूतील अन्नधान्याचा साठा संपत आला होता. वास्तविक टेंपेस्ट विमाने ही काही रसद पुरविण्यासाठी नव्हती. तेथे त्यांना घुसखोरांवर हल्ले आणि स्कार्दू तळाला रसदपुरवठा ही दोन्ही कामे करावी लागत होती. विमानातून टाकण्यात आलेली काही रसद स्कार्दू तळाच्या बाहेर पडून ती घुसखोरांच्या हाती पडत होती. 8 जुलै रोजी स्कार्दूतील सारे अन्नधान्य संपले होते. थापाने तातडीचा संदेश पाठविला. त्याच दिवशी विमानातून अन्नधान्याची सहा पिंपे टाकण्यात आली. यातील दोन नदीच्या पात्रात पडली. स्कार्दूची दररोजची गरज 360 किलोग्रॅमची होती. जुलै संपला. उन्हाळा सुरू झाला. चेरीच्या वृक्षांना पालवी फुटू लागली. स्कार्दू खोऱ्याच्या दगडी पार्श्वभूमीवर ही कोवळी हिरवी पालवी उठून दिसत होती. निसर्गात नवजीवन संचारले होते. पण स्कार्दूच्या किल्ल्यात अडकलेल्या 600 लोकांच्या जीवनातील चैतन्य जणू संपत आले होते. दररोज गव्हाचा दोन चपात्या व एक कप चहा यावर या लोकांना दिवस काढावे लागत होते. कुपोषणाचे परिणाम दिसू लागले होते. किल्ल्यातील लोक हाडामांसाचा सापळा झाले होते. स्कार्दूचा वेढा सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला होता. 7 ऑगस्ट रोजी भारतीय वायुदलाच्या दोन टेंपेस्ट विमानांनी अन्नधान्याचे दोन पिंप टाकले. थापा व त्याच्या सहकाऱ्यांजवळील शस्त्रास्त्रे संपत आली होती. प्रत्येक जवानाजवळ फक्त दहा काडतुसे शिल्लक राहिली होती. आणि त्यांना युद्ध लढवायचे होते. युद्धाचा शेवट जवळ आला होता. शेवटचा मार्ग म्हणून किल्ल्यात अडकून राहिलेल्या लोकांनी दोन-तीनच्या गटाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यात राहून मरणाची हमी होती तर बाहेर पडताना जगण्याची संधी होती. अंधारात बाहेर पडतानाही मृत्यू गाठण्याची शक्यता होती. मृत्यूला हुलकावणी देण्याच्या इराद्याने लोक रात्रीच्या अंधारात बाहेर पडू लागले. 12 ऑगस्ट रोजी पाकच्या कर्नल शहजादने थापाला संदेश पाठविला. ‘स्कार्दू तळाला मदत करण्याचे ब्रिगेडियर फकिरसिंग, लेफ्ट. कर्नल कृपालसिंग, संपूर्णबचनसिंग यांचे प्रयत्न फसले आहेत. तुम्ही एखाद्या सैनिकाला शोभेल असा संघर्ष केला आहे. आता आमच्याशी संघर्ष करण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. तुम्ही शरण यावे अशी विनंती मी करीत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी केवळ सैनिकच नाही, माझ्या नसानसात शाही रक्त आहे. त्या रक्ताची शपथ घेऊन मी तुम्हाला सुरक्षेची हमी देत आहे. तुमच्याच एका जवानाला मी पांढरे निशाण घेऊन पाठवीत आहे. तुम्ही शरणागतीस तयार असल्यास हे पांढरे निशाण तुमच्या अधिकाऱ्याला देऊन त्याला आमच्याकडे पाठवा.‘ लेफ्ट. कर्नल शेरसिंग थापाने या संदेशास कोणतेही उत्तर दिले नाही. स्कार्दू तळावरील स्थिती पार कोसळली होती. शस्त्रास्त्रांचा साठा संपला होता. थापाचा संघर्ष संपणार होता. थापा व त्याच्या सहकाऱ्यांनी उपाशीपोटी युद्ध लढले होते. पण दारूगोळा संपल्यानंतर त्यांच्याजवळ शरणागती हाच पर्याय शिल्लक उरला होता. 14 ऑगस्ट उजाडला हा पाकिस्तानचा पहिला वर्धापनदिन. थापाजवळ फक्त 4 अधिकारी, 35 जवान व मोजकी काडतुसे शिल्लक राहिली होती. सकाळी आठ वाजता लेफ्ट. कर्नल थापाने स्कार्दूतून श्रीनगर मुख्यालयाला शेवटचा संदेश पाठविला. त्यानंतर थापाने बिनतारी यंत्र अबोल झाले. स्कार्दू कोसळले होते.