गंगा

नद्यांच्या वैज्ञानिक अभ्यासाची नितांत गरज

दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, रविवार 24 ऑगस्ट 2008
गंगा नदीच्या उगमापासून ते समुद्राला मिळेपर्यंतचा प्रवास मांडणारे 'गंगा' हे पुस्तक भारतीयांच्या उपासनेच्या भावनेतून, शास्त्रज्ञांच्या नजरेतून आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लिहिण्यात आले असून, या पुस्तकाचा उपयोग धरणे बांधण्याच्या किंवा वीज निर्मितीच्या कामात संदर्भ म्हणून केला जाऊ शकतो, असे मत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले. 'अमेय प्रकाशन'तर्फे फ्रेंच पत्रकार ज्युलियन क्रॅंडॉल हॉलिक यांनी लिहिलेल्या गंगा नदीच्या प्रवासाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन झाले. हा अनुवाद 'महाराष्ट्र टाइम्स' चे डेप्युटी एडिटर प्रकाश अकोलकर यांनी केला आहे. प्रकाशक उल्हास लाटकर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय भावना मांडणाऱ्या, श्रद्धेचा विचार पुढे नेणाऱ्या नद्यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची गरज असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. मांडणी करताना अनुवादकाने लेखकाच्या मूळ संकल्पनेला धक्का लागू दिलेला नाही. तसेच निरीक्षणे आणि प्रवाही भाषा वापरून पुस्तकाचा बाज जपला आहे. असे शिंदे यांनी नमूद केले. प्रकाशकांनी अनुवादाबाबत विचारणा केली तेव्हा विषय अजिबात माहीत नव्हता; पण प्रत्यक्ष काम करताना गंगा नदी ही अस्तित्व टिकवणारी असल्याचे लक्षात आले. असे अकोलकर यांनी सांगितले. नदीला देव मानून उपासना करणारे लोकच नदीचे प्रदूषण कसे करतात. हा हॉलिक यांना पडलेला प्रश्न आपल्यालाही पडल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुस्तकातील वेचक भागांचे वाचन केले. भागिरथी प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. प्रकल्पावर 550 कोटी रु. खर्च झाले असून, त्यातून सुमारे 500 मेगावॅट वीज मिळणार असताना, प्रकल्पात सहभागी असणारे इंजिनिअर्स प्रकल्प थांबवा असे म्हणतात. अशा प्रकारच्या समस्यांची खंत वाटत असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रकल्पाजवळ नदीचे पाणी वळवल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याही श्रद्धेचा प्रश्न असून या समस्येचे उत्तर शोधायचा सरकारचा प्रयत्न आहे, असे नमूद केले.

गंगा

जल, जंगल, जमीन वाचवा - स्वामी रामदेवबाबा

दै. सामना, पुणे, बुधवार 29 एप्रिल 2009
निसर्गापासून माणसाची उत्पत्ती झाली असल्याने संपूर्ण मानवजातीला वाचविण्यासाठी जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करा, असे आवाहन पतंजली योगपीठाने गुरू स्वामी रामदेवबाबा यांनी केले. अमेय प्रकाशनतर्फे प्रसिद्ध केलेल्या 'गंगा' या ज्युलियन हॉलिक यांच्या अनुवादित मराठी ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्वामी रामदेवबाबा यांच्या हस्ते हरिद्वार येथे झाले. याप्रसंगी पुस्तकाचे अनुवादक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व अमेय प्रकाशनचे प्रकाशक उल्हास लाटकर उपस्थित होते. स्वामी रामदेवबाबा म्हणाले, निसर्गापासूनच माणसाची उत्पत्ती झाल्याने संपूर्ण मानवजातीला वाचविण्यासाठी जल, जमीन, जंगल या संसाधनांचे संरक्षण करण्याची गरज आहे. या गोष्टी वाचविल्या नाहीत, तर दुष्काळ, भूक, भय, दहशतवाद ही अरिष्टे कोसळून सर्वनाश होईल. हिंदुस्थानात पावसाचे 90 टक्के पाणी वाया जात असून, या पाण्याचे संवर्धन केले पाहिजे. मानवाच्या पापक्षालनासाठी भूतलावर अवतरलेल्या गंगा नदीची आजची स्थिती मात्र बिकट आहे. फ्रेंच प्रसारमाध्यम तज्ज्ञ ज्युलियन हॉलिक यांनी गंगेच्या उगमापासून ती जिथे समुद्राला मिळते, त्या सागर बेटापर्यंत गंगा परिक्रमा करून तिची सद्यस्थिती कथन करणारे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाश अकोलकर यांनी केला आहे.

सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे यांचे कार्य उपेक्षितांसाठीच

दै. सकाळ, पुणे, रविवार 6 ऑक्टोबर 2013
'एका संघर्षाची वाटचाल' पुस्तक प्रकाशनप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे गौरवोद्गार
पुणे. ता. 5 : ''राज्याने अनेक मुख्यमंत्री पाहिले, परंतु सुशीलकुमार शिंदे यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम केले,’’ असे गौरवोद्गार सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले. निमित्त होते. 'अमेय प्रकाशन'च्या 'सुशीलकुमार शिंदे - एका संघर्षाची वाटचाल'या पुस्तकाच्या प्रकाशनाचे.
ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पुस्तकाचे लेखक डॉ. पी. आर. सुबास चंद्रन, अनुवादक संतोष शेणई उपस्थित होते. शिंदे हे सर्वांना सोबत घेणारे, उत्तम प्रशासक, उपेक्षितांना न्याय देणारे आणि कणखर नेते असून, त्यांच्यावरील हे पुस्तक म्हणजे लोकशाहीची यशस्वी वाटचाल असल्याचे पाटील म्हणाले.
ते म्हणाले, ‘‘आयुष्य हाच एक संघर्ष आहे. या संघर्षातील यशातून मिळणाऱ्या आनंदामुळेच शिंदे यांचा चेहरा नेहमी हसरा आहे. त्यांनी कधी स्वतःचा किंवा कुटुंबाचा विचार केला नाही. उपेक्षित वर्गालाच त्यांनी सतत आपल्या कामाचा केंद्रबिंदू मानले’’
शिंदे यांनी स्वप्ने पाहून ती प्रयत्नपूर्वक साकार केल्यानेच ते उच्च पदापर्यंत पोचल्याचे टिकेकर यांनी सांगितले. ध्येयाने प्रेरित होऊन त्याची पूर्ती करणाऱ्यांची अशी अत्यंत थोड़ी उदाहरणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘डॉ. नी. त्र्यं. पुंडे आणि प्रा. श्रीराम पुजारी या शिक्षकांमुळे शिंदे यांना साहित्य, संगीत, कला या क्षेत्राची गोडी लागली.’’

द कम्प्लिट गाईड टू बिकमिंग प्रेग्नंट

आईपणाची आस पूर्ण करायचीय?

दै. सकाळ, फॅमिली डॉक्टर, शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2013
‘द कम्प्लिट गाईड टू बिकमिंग प्रेग्नंट' हे डॉ. फिरुझा परीख यांचं पुस्तक माझ्या हाती आलं, तेव्हा माझे मन थोडं द्विधा होतं. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना ‘सरोगेट' पद्धतीनं अपत्य प्राप्त होणार असल्याची ‘बातमी' तेव्हा गाजत होती. डॉ. परीख यांनीच शाहरुख-गौरीला अपत्यप्राप्तीचा मार्ग दाखवला होता. दिग्दर्शिका फराह खान हिने डॉ. परीख यांच्यामुळे तिला प्राप्त झालेल्या तिळ्यां मुलांची सांगितलेली गोष्ट मला आठवत होती. अपत्यप्राप्ती शास्त्रात आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या डॉ. परीख यांचं ‘इंडिया टुडे'ने पन्नास ‘पॉवरफुल' लोकांच्या यादीत समावेश कलेला मी वाचलं होतं. त्यामुळे त्या काय सांगणार आहेत, याविषयी उत्सुकताही होती; पण गर्भारपणाविषयी आणि मातृत्वासंबधी इतकी पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत, की या पुस्तकांच्या रांगेत आणखी एक पुस्तक, असं तर असणार नाही ना हे, अशी शंकाही मनात होती. या द्विधा मनःस्थितीतच हे पुस्तक हाती घेतलं आणि एक पुस्तक नव्हे, तर आईपणाची आस पूर्ण करण्यासाठीचं ‘गाईड' हाती गवसल्यासारखं वाटलं. शीर्षकाप्रमाणंच, गर्भारपण अनुभवण्याचं हे संपूर्ण मार्गदर्शन आहे, हे सांगायलाच हवं.
आपल्या संस्कृतीत आईपणाला अतिशय महत्त्व देण्यात आलं आहे. नैसर्गिकपणे स्त्रीला आतून मातृत्वाची आस असतेच; पण त्याचबरोबर आई होणं हा सामाजिक दडपणाचाही भाग असतो. त्यामुळेच मूल झालं की आई झाल्याचं सुख जशी स्त्री अनुभवते. तशीच समाजाच्या टोचदार नजरांनी आता आपण घायाळ होणार नाही, या भावनेने सुटकेचा आनंदही मिळवते. कारण मूल न होणं हा केवळ स्त्रीचाच दोष आहे असं मानणारी आणि त्यातून कलह, दुःख ओढवून घेणारी अनेक कुटुंबं आपल्या आसपास दिसतात. या पार्श्वभूमीवर मला हे पुस्तक खूपच महत्त्वाचं वाटतं. या पुस्तकात आई होण्यासाठीचं शास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान नीट समजावून दिलं आहेच; पण मला त्याहून महत्त्वाचं वाटतं ते सकारात्मक भूमिकेतून सहज समजावणं. ‘शास्त्रीय उपचार हा नंतरचा भाग, आचार-विचार हा पहिला उपचार' हे सूत्र ठेवून डॉ. फिरुझा आपल्याकडे योणाऱ्या जोडप्यांकडे पाहतात.
कुणाही स्त्रीला आई व्हायचंय हे मनापासून वाटलं पाहिजे, तर ती आई होऊ शकते, हे सकारात्मकतेनं त्या कसलाही आव न आणता पटवतात. आपल्याकडे आलेल्या प्रत्येकावर बाह्य उपचार करायचेच आहेत, ही त्यांची वृत्ती नाही. त्यापेक्षा कोणतेही बाह्य मार्ग न हाताळता नैसर्गिकपणे आई होण्याचा हक्क स्त्री बजावू शकते का, हे त्या प्रथम पाहतात. जेथे निसर्गाला कृतीला प्रवृत्त करता येत नाही असं वाटतं, तेथे मग त्या कृत्रिम मार्गांचा अवलंब करतात. त्या चांगल्या डॉक्टर असल्याचे हे प्रथम लक्षण होय.
डॉ. फिरुझा पहिल्यांदाच स्पष्ट करतात. की मूल होत नाही याच्या मुळाशी बऱ्याचदा गर्भ राहण्याच्या प्रक्रियेची नीट माहिती नसणं, हे कारण असतं. गर्भ होण्यासाठी शरीरसंबंधांची गरज असते, हेच कित्येक पती-पत्नींना माहिती नसतं, हे आजच्या काळाही घडतं, हे ऐकल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. अशा जोडप्याला नीट माहिती करून देणं हाच उपचार असतो. वंध्यत्व हे फार कमी जणांमध्ये असतं. त्याची कारणंही फार गुंतागुंतीची नसतात. त्यामुळे बऱ्याचदा उपचाराने वंध्यत्वावर मात करता येते. सध्याच्या जीवनशैलीत काही वेळा मूल न होण्याची कारणं दडलेली असतात. पतीने रात्री उशीरा कामावरून घरी परतणं, एकमेकांना पुरेसा वेळ न देणं ही मूल न होण्याची कारणं असू शकतात. सिगारेट किंवा दारू पिणं पुरुषाच्या शुक्राणूवर परिणाम करू शकतं. एका तरुणाने  सिगारेट सोडल्यावर शुक्राणूंच्या हालचालींचा वेग आला आणि सहा महिन्यांत त्या जोडप्याला मूल झालं, हे उदाहरण त्या सांगतात. प्रत्येक गोष्ट आपल्या एखाद्या रुग्णाचं उदाहरण देऊन सांगण्याची पद्धती डॉ. फिरुझा यांनी अवलंबलेली आहे. त्यामुळे ती गोष्ट पटकन समजते आणि आपल्यासारखी समस्या असलेली आणखीही जोडपी आहेत, आपण एकटेच नाही; त्यांना मूल झालं आहे, त्यामुळे आपल्यालाही मूल होईल, हा दिलासा मिळतो.
गर्भ राहण्याची प्रक्रिया त्या समजावून सांगतात. मूल व्हावं असं वाटणाऱ्या जोडप्यांनी कोणत्या दिवसात काय पथ्यं पाळावीत, मुलासाठी प्रयत्न करण्याचे नेमके दिवस कसे निवडावेत, यासाठी त्या टिप्स देता. कोणत्याही डॉक्टरच्या मदतीशिवाय घरच्या घरी सहज करता येण्यासारख्या या गोष्टी आहेत. वंध्यत्वाची कारणं किती आहेत, यातील बहुतेक समस्या आपण आपल्या आहार-आचार-विहाराने कशी दूर करू शकतो. हे प्रत्येकाने समजून घेण्यासारखं आहे. जंतुसंसर्गामुळे काही वेळा समस्या उद्भवलेल्या असतात, त्यावर नेमकेपणाने उपचार केले की नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊ शकते. डॉ. फिरुझा यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं आहे, की त्या आई होणं हे शक्य आहे, हा विश्वास देत संवाद साधत आहेत. कृत्रिमपणे गर्भधारणा कधी करावी लागते व कशी केली जाते. सरोगेट मदर म्हणजे नेमके काय, हा पर्याय कधी निवडला जातो., यातील समज-गैरसमज काय व वास्तव काय हे त्या समजावून देतात. आयुर्वेद, संगीतोपचार, योगोपचार, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर, निसर्गोपचार या पूरक उपचार पद्धतीविषयीही त्या माहिती देतात. या संपूर्ण उपचार पद्धतीत कोणत्या चाचण्या का व कधी केल्या जातात, या क्षेत्रात कोणतं नवं संशोधन सुरू आहे, ही माहितीही उपयुक्त ठरते. दिग्दर्शिका फराह खान हिने स्वतःच्या गर्भारपणाची सांगितलेली गोष्ट प्रेरणादायी ठरेल. प्रा. रेखा दिवेकर यांनी सहजसोप्या भाषेत हे पुस्तक मराठीत आणलं आहे. यातील शास्त्र, प्रत्येक प्रक्रिया स्वत:समजून घेऊन त्यांनी ती समजावून दिल्याने पुस्तकाची विश्वासार्हता वाढली आहे. आई होण्यात काही कुणाला समस्या असेल तर हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते.