पुस्तकाची मी सरोगेट मदर

दै. लोकसत्ता, शनिवार, 21 सप्टेंबर 2013,
पार्ल्याच्या सुप्रसिद्ध साठ्ये कॉलेजमधून मी 2010 मध्ये निवृत्त झाले. रसायनशास्त्र हा विषय मी शिकवत असे, पण त्या बरोबरीनेच साहित्याची आवडही जपलेली होती. मात्र निवृत्तीनंतर या प्रांतात काही करता येईल का, याची चाचपणी करत असतानाच माझी मुलगी ऋजुता दिवेकर हिचे दुसरे पुस्तक ‘विमेन अँड द वेटलॉस तमाशा' हे इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाचा अनुवाद करण्याची संधी मला ‘अमेय प्रकाशन' तर्फे मिळाली. हे पुस्तक अनुवाद करण्यास काही अडचण येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण लेखिकेशी मी 24/7 कधीही संवाद साधू शकत होते ! त्यानंतर ‘अमेय'कडूनच मला ‘द कम्प्लिट गाईड टु बिकमिंग प्रेग्नंट' या डॉ. फिरुझा परीख यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद करण्यासंबंधी विचारणा झाली. डॉक्टरांविषयी आदरभाव मनात होता. ‘अशक्य ते शक्य' करण्याच्या त्यांच्या जिद्दीची, चिकाटीची, प्रयत्नांची प्रशंसा मनोमन करत होते. त्या सुमारालाच ‘अनुबंध' ही टीव्ही वरील मालिका त्यातील ‘सरोगसी'मुळे गाजत होती. परंतु त्याबद्दल अनेक समज-गैरसमजही समाजात निर्माण झालेले होते. हे  पुस्तक मराठीत आले तर अनेक स्त्रियांना विशेष करून ज्या वंध्यत्वावर उपचार घेत आहेत, त्यांना योग्य ती माहिती मिळेल व या प्रगत तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यास त्यांना भावनिक, मानसिक बळ मिळेल असे वाटत होते.
परंतु स्त्रीरोगांविषयीचे प्रगत तेही तांत्रिक व्याख्यांनी भरलेले पुस्तक असेल तर आपल्याला अनुवादित करता येईल का? अशी शंका मनात येत होती. मग मी माझ्या डॉक्टर भाऊ-वहिनींकडून काही संकल्पना समजून घेण्याचे ठरवून हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय शब्दकोषाचा आधार घेतला.
अनुवाद करताना मला आलेल्या शंकांचे समाधान मी डॉ. फिरुझांकडूनच करून घेण्याला पसंती दिली. कारण अनुवादकाची बांधिलकी मूळ लेखकाशी असणे फार महत्त्वाचे आहे.
सहा महिने अनुवादाचे काम करताना मी या पुस्तकाची सरोगेट मदर कधी झाले ते माझे मलाच कळले नाही. खरं तर अनुवादकाची भूमिका सरोगेट मदरचीच हवी. गर्भधारणेत सहभाग नाही, पण गर्भांचे पोषण मात्र करायचे. तद्वत अनुवादकाने मूळ लेखकाच्या लिखाणावर आपल्या भाषेचे संस्कार करून पुस्तकनिर्मिती करावयाची. या काळात डॉक्टरांच्या ज्ञानाविषयी, संशोधनाविषयी जाणून मी प्रचंड प्रभावित झाले. तसेच मूल होण्याविषयी समाजात असलेल्या गैरसमजांमुळे स्त्रियांना जो शारीरिक व मानसिक त्रास भोगावा लागतो ते जाणून मन हेलावले. वंध्यत्वाची समस्या असली तर त्यासंबंधीची कारणे जाणून घेण्यास व योग्य उपचारांची दिशा ठरविण्यास हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
प्रा. रेखा दिवेकर

आई होण्यासाठी
मी गेली 25 वर्षे ‘वंध्यत्व व त्यासंबंधातील उपचार' या क्षेत्रात काम करत आहे. या टप्प्यावर आपला अनुभव पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडावा, जेणे करून अनेक जोडप्यांना याचा फायदा होईल असे वाटले व लेखन सुरू झाले. त्यातूनच गरोदरपणाविषयीच्या सर्व शंकांचं निवारण करणारं तसेच वंध्यत्व आणि त्या बाबतच्या उपचारासंबंधीचं सहजसोप्या भाषेतलं विश्लेषण करणारं ‘द कम्प्लिट गाईड टु बिकमिंग प्रेग्नंट' हे पुस्तक तयार झालं आणि लिहिण्याचे पुरेपूर समाधान देऊन गेलं. पुस्तकात वंध्यत्वनिवारणाचा विषय मांडला असून मूलभूत प्रजनन संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल सुरुवातीला माहिती देऊन वंध्यत्वाला कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात, या विषयांवर मी विस्तृत लेखन केले आहे. वंध्यत्वावर कोणकोणते उपचार किंवा तंत्रे वापरली जातात हे सांगण्याबरोबरच ‘आयव्हीएफ' मध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या प्रयोगशाळेशी संबंधित सर्व  प्रक्रियांबाबतची माहितीही त्यात समाविष्ट केली आहे. पुस्तकात आवर्जून काही सक्सेस स्टोरीज सांगितल्या आहेत, त्यातून निश्चितपणे धीर आणि आशा मिळू शकेल.
- डॉ. फिरुझा परीख
(इंग्रजी पुस्तकाच्या मूळ लेखिका)

डाएट.. सुखाचं

शरीर अन् मनाच्या आरोग्याचे डाएट

दै. सामना, उत्सव, रविवार, 14 जुलै 2013,
सुप्रसिद्ध मॉडेल तसेच अभिनेत्री याना गुप्ता हिची आत्मकथा वाचन असतानाच अचानक त्यात आरोग्याची कहाणी वाचायला मिळते. सुंदर फिगर राहण्यासाठी महत्त्वाचे कानमंत्र दिले आहेत. फिटनेससाठी नवे तंत्रमंत्र मिळतात. शरीर आणि मन फिट राहण्यासाठी यात जे मार्गदर्शन आहे, त्यामुळे हे पुस्तक तरुण मंडळींसाठी एक संग्राह्य डाएट बुक बनले आहे. ‘द फेस ऑफ लॅक्मे' असणारी याना ही तिच्या सौंदर्यामुळे आणि फिगरमुळे ग्लॅमरस दुनियेत नंबर वन ठरली. ‘झलक दिखला जा' यात ती फायनलिस्ट म्हणूनही होती. तिने तिच्या अनुभवाच्या जोरावर या पुस्तकाची मांडणी केल्यामुळे त्यात कुठेही उपदेश किंवा मार्गदर्शनाचे कृत्रिम ठोस वाटत नाहीत तर त्याला सत्यरूप आलंय.
यानाच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद साहित्यिक व पत्रकार असलेल्या अरुण अंतरकर यांनी ओघवत्या भाषेत केला आहे. शैलीत जराही बोजडपणा नाही. अंतरकरांनी दिलेले मनोगत बोलके असून आरोग्याच्या लढाईचे पारडं पराजयाकडून विजयाकडे जाण्याचा मंत्र नेमक्या शब्दात मांडणारा आहे.
वजन कमी करण्याचे वेड, हवं ते मिळविण्याचा प्रकार, हवी तशी फिगर मिळविण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम, स्वतःवर प्रेम कसं काय करावं? तुमच्यासाठी योग्य व्यायाम - सारं तीन भागांत बसविण्यात आले आहे. काही तक्ते, चौकटींचाही यात समावेश आहे. एक अनुभवाचे बोल यात आहेत. त्यामुळे ते पुरेपूर पटतात.
खाण्याच्या चुकीच्या सवयी कशा काय सोडाव्यात? नकारात्मक विचारांचे नियंत्रण कसे काय करावे? स्वतःवर प्रेम करण्याचे सोपे उपाय कोणते आहेत? भुलविणाऱ्या ‘डाएटस' जाहिराती व आश्वासनांपासून सावध कस राहावे? या प्रश्नांची उत्तरे यात मिळतात. त्यात कुठेही उपदेशाचे डोस वाटत नाहीत तर एखादी आपली मैत्रीण संवाद साधत आहे. असा हा अनुभव आहे.
पुण्यातील नामांकित अमेय प्रकाशन संस्थेचे उल्हास लाटकर यांनी आपल्या परंपरेला शोभून दिसणाऱ्या या आशयपूर्ण पुस्तकाची सर्वांगसुंदर निर्मिती केली आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद हा मराठीत आणून शरीर आणि मनाच्या सुखाचा रामबाण उपायच यात ओघवत्या भाषेत सांगितला आहे. अशा हटके पुस्तकाची मराठीत गरज होती. ती अमेय प्रकाशनने पूर्ण केली आहे. तरुण-तरुणींना एका ‘सुखाचं डाएटच' जणू  यातून मिळू शकेल.
भाग्यश्री साठे

कनेक्ट द डॉट्स

उद्योजकांच्या प्रेरक यशोगाथा सांगणारे कनेक्ट द डॉट्स

दै.  देशदूत, नाशिक, रविवार, 17 जून 2012

मनात दुर्दम्य इच्छाशक्ती, डोक्यात स्पष्ट अन् सकारात्मक विचार आणि कृतीसाठी सज्ज हात असतील तर कोणतीही पदवी-उच्च पदवी वा पिढीजात श्रीमंती नसतानाही एखादा उद्योजक मोठे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवू शकतो, हा विचार सिद्ध करून दाखविणाऱ्या 20 उद्योजकांच्या प्रेरक यशोगाथा सांगणारं ‘कनेक्ट द डॉट्स'  हे अमेय प्रकाशन, पुणे यांनी मराठी अनुवादात प्रकाशित केलेलं पुस्तक. स्वत: उद्योजिका व युवा तज्ज्ञ असलेल्या रश्मी बन्सल या पुस्तकाच्या लेखिका आणि अनुवाद केला आहे, आरती कदम यांनी. यापूर्वी या लेखिकेने  ‘स्टे हंग्री स्टे फुलिश' हे बेस्ट सेलर पुस्तक वाचकांना दिले आहे.
आपल्या मनोगतात लेखिकेने स्वानुभवाचा स्पर्श असेलला एक महत्त्वूपर्ण विचार मांडला आहे. ‘मुक्त व्हा, बाहेर पडा, अधिकाधिक व विविध गोष्टी करीत रहा, अधिक शिका, अधिक अनुभव घ्या. आयुष्याच्या कॅनव्हासावर अनुभवांचे असंख्य बिंदू निर्माण करा...'
असे बिंदू-बिंदू जोडून ज्यांनी मोठी झेप घेतली अशांच्या गोष्टी म्हणजे हे नितांत स्फुर्ती अन् प्रेरणादायक पुस्तक.
हे पुस्तक वाचायला हाती घेतल्यानंतर यातील सर्वच उद्योजक वाचकात चैतन्य, आत्मविश्वास फुलवीत, मनमोकळ्या गप्पा करीत स्वतःची कहाणी उघडून दाखवितात. मग तो मुंबईत येऊन भांडी घासण्याच्या कामापासून सुरुवात करून ‘डोसा प्लाझा' चा मालक होण्यापर्यंतचा प्रवास करणारा प्रेम गणपती असो वा इंजिनिअरिंगची पदवी नसताना पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रांच्या ‘सू-काम' कंपनीची उलाढाल 500 कोटींच्यावर पोहचविणारा कन्वर सचदेव असो. अथवा एन.एस.एस.चं काम करताना स्वतःत शिकविण्याची कला आहे हे लक्षात आल्यावर इंग्लिश संभाषणाच्या क्षेत्रात भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र म्हणून ख्याती असणाऱ्या ‘वेटा'च्या उभारणीपर्यंत धडक मारणारा गणेशराम असो वा ‘फेम' हे त्वचा गोरी करणारं ब्लिच तयार करणारी कंपनी एका लहानशा घरात सुरू करून पुढे तिला 27 वर्षे अनके बड्या बहुराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्याचा दर्जा देणारी सुनीता रामनाथकर असो किंवा ज्याला अभिनेता व्हायचं होतं, परंतु आपलं सामर्थ्य मराठी रंगभूमीवरील नाटकं लिहिण्यात आणि दिग्दर्शित करण्यात असल्याचं लक्षात येताच ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी'  ही फिचर फिल्म ऑस्करच्या नामांकनासाठीची भारताची अधिकृत एन्ट्रीपर्यंत घेऊन जाणारा परेश मोकाशी असो.
एकूण 20 एकाचढएक कर्मयोगी, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा कर्तृत्वगाथेचं हे पुस्तक वाचकांना उठण्याची, चालण्याची, पळण्याची निःसंशय शक्ती, प्रेरणा देणारं आहे. आपल्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं असं वाचकांना वाचायला हे पुस्तक प्रवृत्त करतं.
लेखिका - रश्मी बन्सल, अनुवाद - आरती कदम, मराठी आवृत्तीचे प्रकाशन - अमेय प्रकाशन, पुणे. पृष्ठे 397, किंमत रु. 150/-.

मजेत जगा - तणावमुक्त जगण्यासाठी

तणावाचं मूळ हे तुमच्या जीवनशैलीत - मिलिंद सोमण

दै. सामना, पुणे, रविवार 24 मार्च 2013
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस कायम तणावाखाली वावरत आहे. यातूनच पुढे त्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या तणावाचं मूळ तुमच्याच जीवनशैलीत आहे, असे मत हिंदुस्थानातील आघाडीचा मॉडेल मिलिंद सोमण यांनी व्यक्त केले.
फिटनेस एक्सपर्ट डियन पांडे यांनी लिहिलेल्या 'आय ऍम नॉट स्ट्रेस्ड' या पुस्तकाचा 'मजेत जगा-तणावमुक्त जगण्यासाठी' हा मराठी अनुवाद व्यंकटेश उपाध्ये यांनी केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मिलिंद सोमण यांच्या हस्ते नुकतेच झाले. अमेय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मिलिंद सोमण आणि डियन पांडे यांची अमेय प्रकाशनचे प्रमुख उल्हास लाटकर यांनी मुलाखत घेतली.
मिलिंद सोमण यांनी गेल्या वर्षी 'ग्रीनथॉन'या उपक्रमांतर्गत 1500 किलोमीटर धावण्याचा विक्रम केला. तसेच मॉडेलिंगसारख्या अस्थिर क्षेत्रात काम करताना मानसिक, शारीरिक स्वास्थ्य कसे टिकवावे हे सांगून फिटनेस, जीवनशैली व्यवस्थापन यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या गतिमान जीवनशैलीतही कमीत कमी वेळात तणावमुक्त करत शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे सिक्रेट म्हणज हे पुस्तक, असे डियन पांडे म्हणाल्या. अभिनेता शाहरूख खान यांची प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे.