शब्दांचे सामर्थ्य

शब्दांचे सामर्थ्य - यशवंतराव चव्हाण यांचे लेख, साहित्य व भाषणे

संपदा, जुलै 2012
संपादक - राम प्रधान
अमेय प्रकाशन - द्वितीयावृत्ती - 1 जून 2012
मा. कै. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांत ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती अमेय प्रकाशनने प्रकाशित केली आहे. नुसतेच लोकांचे नेते, मुत्सद्दी राजकारणी, कुशल प्रशासकच नव्हे तर यशवंतरावजी हे तितकेच साहित्यिक होते. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. यावरील पुस्तकातल्या प्रत्येक लेखातून त्यांचे अनेक गुण व पैलू दिसून येतात. त्यांच्या संपन्न अशा वैचारिकतेची ओळख ह्या पुस्तकातून होते. ह्या पुस्तकाचे चार भाग केले आहेत व त्याची विभागणी संस्कार, व्यक्ति, विचार व चिंतन अशी करण्यात आली आहे. यशवंतरावांचा लोकसंग्रह प्रचंड होता व त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्ति म्हणजे आपल्या समाजाला मिळालेली एक देणगीच होती. त्यातील अनेक जणांचा खास यशवंतरावांच्या शैलीत आपल्याला ह्या पुस्तकातून परिचय होतो. ह्यातील अनेकांनी महाराष्ट्र घडविला. अशा व्यक्तिसंबंधी पुन्हा एकदा वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. विचार आणि चिंतन ह्या भागातून सुद्धा यशवंतरावांच्या प्रगल्भ, चौफेर व परिपक्व अशा विचारसरणीची पुन्हा एकदा ओळख होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ना. सी. फडके इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या विचार, भाषाशैली संबंधी गौरवोद्गार काढलेले आहेत.
हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जाऊन यशवंतराव व त्यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची व त्यांच्या प्रचंड कार्याची पुन्हा एकदा आठवण करून देते. हे एक नक्कीच वाचनीय व संग्रही पुस्तक आहे.
पुस्तक परिचय : अनंत सरदेशमुख
(डायरेक्टर जनरल, मराठा चेंबर व संपादक ‘संपदा')

यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली -

दै. सागर, 29 सप्टेंबर 2013

लेखक सी. ई. पोतनीस यांनी यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली असणारे ‘चला... यशस्वी होऊ या' हे पुस्तक लिहिले असून अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे यांनी ते प्रकाशित केले आहे.
आजकाल उत्तम गुण असूनही करिअरमध्ये मागे पडताना अनेक तरुण दिसतात. अनेकांना यश हुलकावणी देत असते. तसेच जीवनाचा आनंद घेता न येणे हे बहुतेकांच्या बाबतीत आढळते. जीवनाविषयीच्या अज्ञानामुळे बहुतेकजण चुकीच्या दिशेने जाताना आढळतात. बदलत्या जीवनपद्धतीत भावनांचे व्यवस्थापन आत्मसात करणे आवश्यक आहे.
या पुस्तकात जीवनातील महत्त्वाच्या विषयावर उपयुक्त आणि मौलिक माहिती दिली आहे. न्यूनगंड, कल्पनाचित्रणाचे सामर्थ्य, यशाची व्याख्या, कार्यपद्धती, ध्येय, संधी, नेतृत्व, कष्ट, कृतज्ञता, आरोग्य, दृष्टिकोन, जीवनाची बैठक यांसारख्या विषयावर केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांबरोबर पालकांना व तरुणांनाही उपयुक्त आहे. आनंदी जीवनासाठी केलेले विवेचन सर्वांसाठी नवी दिशा देणारे आहे.
चला यशस्वी होऊया ! लेखक - सी. ई. पोतनीस, मोबा- 9850981903, प्रकाशन - अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे, किंमत रु. 160/- पृष्ठे - 132.

सचिनच्या 100 शतकांची कथा

शतकवीराच्या शतकाची कथा...

रविवार, 27 ऑक्टोंबर 2013 सप्तरंग सकाळ

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटप्रेमी यांचं अनोख नातं आहे. सचिनबद्दल कितीही लिहिलं तरी ते अपुरं आहे. पुढील महिन्यातील दोन कसोटी सामन्यांनंतर सचिन खऱ्या अर्थानं क्रिकेटमधून निवृत्त होईल. सध्या तो फक्त कसोटी सामने खेळत होता. सचिनबद्दल मराठीत तरी बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. आता त्याच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही पुस्तकं येतील आणि आधीच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्या येतील. अमेय प्रकाशनाच्या वतीनं ‘सचिनच्या 100 शतकांची कथा...' हे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होत आहे. व्ही. कृष्णस्वामी यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद वंदना अत्रे यांनी केला आह. या पुस्तकात सचिननं केलेल्या शतकांची सविस्तर माहिती आणि त्या वेळच्या सामन्यांची स्थिती याबद्दलचं वर्णन तर असेलच, पण त्याचबरोबर त्याचे विक्रम आणि त्याची वाटचाल याचाही वेध घेण्यात आला आहे. सचिनप्रेमींच्या दृष्टीनं संदर्भमूल्य असलेलं हे पुस्तक महत्त्वाचं ठरावं.

दहशतवाद्यांना आर्थिक बळ पुरविणाऱ्या अफूची गोष्ट! -

'सीडस् ऑफ टेरर'

दै. लोकसत्ता, लोकरंग, रविवार, 8 जुलै 2012
‘धर्म ही अफूची गोळी,' हा शब्दप्रयोग अनेकदा आपल्या कानावर पडतो. अफूचा अंमल चढल्यावर माणसाची सदसद्विवेकबुद्धी जशी कुंठित होते, तशीच अवस्था धर्मांधतेची पटटी डोळ्यांवर ओढल्यावर होते, हा त्याचा मथितार्थ! परंतु धर्म आणि अफू या दोन्हींची सांगड घालत तालिबान, अल् - कायदा या दहशतवादी संघटनांनी जगतील लोकांचं जगणं आज मुश्कील केलेलं आहे. धर्माच्या नावावर निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या तालिबान, अल् - कायदा यांसारख्या संघटनांची सुरुवात, त्यांना आर्थिक बळ देणारे देश याबद्दल आपण अनेकदा वाचतो. परंतु या दहशतवादी संघटनांना अफू कशा प्रकारे आर्थिक बळ देत आहे. अफूच्या शेतीच्या जोरावर या दहशतवादी संघटना भावी पिढीला कसे धोके पोहोचवत आहे, याचे भेदक चित्रण म्हणजे ग्रेचेन पीटर्स लिखित व अभिजित पेंढारकर अनुवादित ‘सीड्स ऑफ टेरर... दहशतवादी बीजे' हे पुस्तक होय.
पुस्तकाच्या लेखिका ग्रेचेन पीटर्स यांनी ‘असोसिएटेड प्रेस,' ‘एबीसी न्यूज' या वृत्तसंस्थांसाठी पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये सुमार दशकभर वार्तांकनाचे काम केले या दरम्यान त्यांनी दहशतवाद, दहशतवादी, त्यांचे वाढते प्रस्थ, त्यांचे आर्थिक स्रोत यांचा मागोवा घेतला. त्यांनी खडतर परिस्थितीत, कोणाचीही भीती न बाळगता दहशतवाद्यांचा मुख्य आर्थिक स्रोत असेलली अफूची शेती आणि तत्संबंधित घटकांचा शोध घेतला आणि एक अहवाल तयार केला. हा अहवाल म्हणजेच हे पुस्तक.
हे पुस्तक वाचताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्रे आहेत, हे या पुस्तकातून उलगडत जातं. या देशांमध्ये दहशतवाद कसा पोसला जातो, या देशांमध्ये दहशतवादी घडविण्यात पाकिस्तानचा कसा महत्त्वाचा वाटा आहे, याचं सप्रमाण चित्र त्यातून उभं राहातं.
अफगाणिस्तानातील जनतेवर तालिबान आणि अल्- कायदाच्या दहशतवाद्यांकडून होणारे अनन्वित अत्याचार, त्यांचे धर्मांध फतवे तसेच स्थानिक सैन्य व दहशतवाद्यांच्या कात्रीत सापडलेली तिथले सर्वसामान्य लोक आणि विशेषकरून शेतकरी यांच्याविषयी वाचताना दहशतवादाचा काळाकुट्ट चेहरा आपल्यापुढे उभा राहतो.
1992 मध्ये अमेरिकेची गुप्त मदत अचानक बंद झाल्यावर अफगाणी बंडखोर आणि त्यांच्या कुटुंबांना स्वतःची सोय स्वत:करण्यावाचून पर्याय राहिला नाही. परिणामी हे बंडखोर शस्त्रास्त्रे आणि अफूच्या व्यापाराकडे वळले. त्यातून अफूची शेती दहशतवाद्यांना आर्थिक बळ पुरविण्यात महत्त्वाची ठरली. ओसामा बिन लादेन हा अमली पदार्थांच्या व्यवसायाकडे वळायला अमेरिकेच्या धोरणांचाही हातभार कसा लागला आहे, हेही या पुस्तकातून दिसून येते. अफूच्या व्यापारास वरवर जरी विरोध असल्याचे लादेन म्हणत असला तरी सुपर हेरॉइन बनविण्यासाठी त्याने काही तज्ज्ञांची नियुक्ती केली होती. हे सुपर हेरॉइन छुप्या मार्गाने आंतरराष्ट्रीय बाजारात विकून तरुण पिढीला नशेच्या आधीन करून त्यांना बरबाद करणं आणि त्याद्वारे दहशतवाद पोसण्यासाठी पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग अवलंबणे, हे या दहशतवादी संघटना करत आल्या आहेत.
अफू पिकवण्याची मोक्याची जागा म्हणजे अफगाणिस्तान. येथील काही भागांमध्ये अफूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जो शेतकरी अफूच्या लागवडीस विरोध करेल त्याच्यावर बळाचा वापर केला जातो. अनेक शेतकऱ्यांना यात आपले प्राणही गमवावे लागले. स्थानिक सैनिकांकडून संरक्षणाची हमी नाही, उलटपक्षी दहशतवादी आणि सैन्य यांच्यातच हातमिळवणी झालेली असते. मग या सामान्य शेतकऱ्यांना वाली कोण? अशा स्थितीत दहशतवाद्यांच्या दबावाला बळी पडण्यावाचून दुसरा कोणताच मार्ग या शेतकऱ्यांसमोर नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना अफूची लागवड करणे मंजूर नाही. परंतु दहशतावाद्यांना कशाच्या बळावर विरोध करायचा, हे मोठेच प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे. लेखिकेने या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन हे सत्य पुस्तकात मांडले आहे. या मुलाखती घेताना त्यांच्यासमोबत तालिबानचा सशस्त्र सुरक्षारक्षक (?) होता. त्यामुळे अनेक शेतकरी तालिबानविरोधात उघडपणे बोलण्यास कचरत होते. सरकारला आम्हाला मदत करायची होती तर तालिबान येण्यापूर्वीच का केली नाही,  असा सवालही एका बुजुर्ग शेतकऱ्याने उपस्थित केल्याचे लेखिका सांगते.
दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी होणारे हवाई हल्ले हीदेखील इथल्या लोकांसमोरची मोठी समस्या आहे. सरकार फक्त मदत करण्याची घोषणा करते. प्रत्यक्षात तालिबानांपुढे टेकलेले गुडघे, कचखाऊ धोरण यावर स्थानिक लोक टीका करतात. अशा अनेक समस्या त्यांना भेडसावत असूनही अफगाणिस्तानच्या हेल्मंड, कंदाहार आणि फराह या प्रांतांमध्ये सुगीच्या हंगामात इराण, पाकिस्तानातून स्थलांतरित कामगार काम करण्यासाठी येतात. त्यांना अफूच्या शेतीत राबायला मोठी रक्कम मिळते. काही परदेशी सैनिकांनाही अफूच्या शेतीत राबताना पकडले गेल्याचे लेखिका सांगते. आर्थिक उत्पन्नाच्या गरजेतून तालिबान आणि शेतकरी एकत्र आले असल्याचे चित्र असले तरीही अनेक शेतकऱ्यांना यातून बाहेर पडायचे आहे, असे लेखिकेला अनेक शेतकऱ्यांनी सांगितल्याचे त्या म्हणतात. परंतु एकीकडे तालिबान्यांची दहशत व दुसरीकडे त्यांच्यापुढे हतबल झालेले अफगाण सैनिक यांच्या कात्रीत हे शेतकरी सापडले आहेत.
2007 मध्ये अफूच्या व्यापारातील तालिबान्यांचा सहभाग कसा वाढत गेला. हेरॉइनचे फिरते कारखाने कसे सुरू झाले, याची माहिती या पुस्तकात आहे.
दहशतवादी आणि अफू यांचा परस्परसंबंध विशद करणारा हा अहवाल तयार करताना  लेखिकेने पाकिस्तानातील पत्रकार सहकारी, अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर या अमेरिकन अधिकाऱ्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या तर्कशास्त्रातील फोलपणा याचेही विश्लेषण लेखिका करतात. या पुस्तकात दहशतवादाचं विदारक चित्र वाचकांसमोर मांडलं जातंच; परंतु धर्माच्या नावाखाली दहशतवाद फोफावणाऱ्या, स्वार्थापोटी आपल्याच धर्मातील लोकांचा नाहक बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचा खोटा चेहराही समोर येतो.
हे पुस्तक म्हणजे केवळ शेतात अफूच्या रूपातून फोफावणाऱ्या दहशतावाद्यांना रसद पुरविणाऱ्या गोष्टींचं भेदक चित्रण नव्हे, तर ग्रेचेन पीटर्स या एबीसी न्यूजच्या महिला पत्रकारानं अफू आणि दहशतवाद यांच्या परस्परसंबंधावर प्रकाश टाकण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न, दहशतवादाने भावी पिढीपुढे कोणती संकटं वाढून ठेवली आहेत ते जाणून घेण्याची, त्यांचा माग काढण्याची तळमळ होय. आंतरराष्ट्रीय राजकारण, अमेरिकेची दुटप्पी धोरणं, कटकारस्थानं अशा अनेक गोष्टी यातून प्रकाशात येतात.
24 तास बातम्या प्रसारित करण्याच्या शर्यतीत बातमीमूल्य नसलेल्या बातम्यांनाही मीठ-मसाला लावून लोकांच्या माथी मारणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि नट-नट्यांची प्रकरणं, त्यांचं उठणं-बसणं यालाच लोकांची सर्वाधिक पसंती असल्याचा ग्रह करून घेणाऱ्या पत्रकार मंडळींना खरी पत्रकारिता काय असते, सामाजिक बांधिलकी व पत्रकारिता यांचा परस्पर संबंध काय, याचा धडा या पुस्तकाने घालून दिला आहे.
मूळ इंग्रजीत असलेल्या या पुस्तकाचा अनुवादही उत्तम वठला आहे. अनुवादकाची ओघवती शैली, गंभीर विषय तितक्याच समर्थपणे मांडण्याची हातोटी त्यातून प्रकर्षाने जाणवते.
‘सीड्स ऑफ टेरर... दहशतवादाची बीजे', मूळ लेखिका - ग्रेचेन पीटर्स, अनुवाद - अभिजित पेंढारकर, अमेय प्रकाशन, पृष्ठे - 223, मूल्य - रु. 255.
लता दाभोळकर