अपना स्ट्रीट

शब्दांकन संघर्षाचे आणि सक्षमीकरणाचेही!

साप्ताहिक सकाळ, 18 जून 2011
मुंबईची मायावी नगरी खोलात जाऊन पाहिली, तर तिचे अनेक पैलू आपल्यासमोर येतात. मुंबईतील रस्त्यांवर, झोपडपट्टीत असंख्य लोक राहतात. त्यांच्या समस्या, रोजीरोटीसाठी त्यांचा संघर्ष, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था या सर्वांवर हे पुस्तक आधारित आहे.
आशय, विषय, निर्मिती प्रक्रिया, सादरीकरण... अशा विविध बाबतीत काही पुस्तके आगळीवेगळी असतात. ‘अपना स्ट्रीट' हे असेच एक अनोखे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे वास्तवात एक कथा आहे आणि गाथाही. ही कथा आहे, मायानगरी मुंबईच्या भायखळा-नागपाडा-कामाठीपुरा परिसरातील पदपथांवर घरसंसार थाटलेल्या अ-लक्षित, अ-नोंदीत आणि म्हणूनच अदृश्य पदपथवासियांची. त्याच वेळी ही गाथा आहे, मुंबईसारख्या अजस्र महानगरातील रस्त्यांवर जन्माला येणाऱ्या आणि रस्त्यावरच अखेरचा श्वास घेणाऱ्या अगणित स्थलांतरित पदपथवासियांनी आपल्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे यासाठी उभारलेल्या अथक संघर्षाची. पुस्तकात अक्षरबद्ध झालेले हे पदपथवासी मुंबईच्या भायखळा परिसरातील (आज बंद पडलेल्या) खटाव मिलच्या पिछाडीला असणाऱ्या अपना झोपडपट्टीच्या भागातील आहेत. महानगरातील पदपथवासीयांच्या हक्काच्या, अधिकृत निवाऱ्याची समस्या मात्र वैश्विक आहे.
मुंबईसारख्या कमालीच्या व्यामिश्र, गुंतागुंतीच्या आणि बहुआयामी गतिमान शहराच्या स्थानीय इतिहासाचा एक बहुमोल संदर्भ व साधनस्रोत ‘अपना स्ट्रीट' द्वारे साकारलेला आहे, हे या पुस्तकाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य. मौखिक इतिहासाचे हे दस्तऐवजीकरण आहे. तरीही या दस्तावेजाचे वाचन कोठेही एकसुरी, कंटाळवाणे होत नाही. या संपूर्ण कथनाच्या केंद्रस्थानी असलेल्या पदपथवासियांची कुटुंबे हे पुस्तक ज्यांच्या संघर्षाचे शब्दांकन करते त्या, त्याच कुटुंबातील स्त्रिया, त्यांचे रोजचे जगणे, त्या जगण्यातील प्रश्न, पदोपदीचा संघर्ष, पोलीस-पालिकांकडून घरांची केली जाणारी विस्कटाविस्कटी आणि उठवणूक, उठविलेला संसार पुन्हा त्याच पदपथावर थाटण्याची त्यांची चिवट जिद्द आणि ‘शहर' नावाच्या सत्तेच्या उतरंडीमध्ये पार तळाच्याही पलीकडे असलेला आपला रास्त वाटा शाबूत राखण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा... हे सगळेच प्रचंड प्रवाही आहे. शहरी मध्यमवर्गीयांच्या अनुभवकक्षेच्या बाहेरचेच हे सारे विश्व आहे. शहरी निवाऱ्याच्या, दिवसेंदिवस विलक्षण जटिल बनत असलेल्या समस्येचे परिघाबाहेरील परिमाण हा दस्तावेज आपल्यासमोर उलगडून मांडतो.
पुस्तकाची वाचनीयता आशय- विषया इतकीच त्याच्या कथन-लेखनशैलीशीही निगडीत आहे. ‘अपना स्ट्रीट' हे एका परीने ‘मल्टिमीडिया प्रॉडक्ट' आहे. अमेरिकेतील नॅशनल पब्लिक रेडिओ, ब्रिटनमधील बीबीसी, कॅनडातील सीबीसी यांसारख्या विख्यात आकाशवाणी माध्यम संस्थांसाठी वैविध्यपूर्ण डॉक्युमेंट्रीज तयार करणाऱ्या ज्युलियन कॅन्डॉल हॉलिक या पत्रकाराची गाठ, मुंबईत कार्यरत असणाऱ्या ‘स्पार्क' या विख्यात सेवाभावी संस्थेच्या शीला पटेल यांच्याशी 1996 मध्ये पहिल्यांदा पडली. गोरेगावच्या दिंडोशी परिसरातील पदपथवासियांच्या पुनर्स्थानांकनाच्या कामात ‘स्पार्क' त्यावेळी आकंठ बुडालेली होती. पदपथवासियांच्या हक्काच्या निवाऱ्यासंदर्भातील बहुमिती समस्येशी ज्युलियनचा संबंध तिथे पहिल्यांदा आला. त्या भेटीमधून यथावकाश, भायखळा परिसरातील पदपथवासी कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या ‘महिला मीलन' या व्यासपीठाची जन्म कहाणी ज्युलियनला समजली. मग ज्युलियनने ‘महिला मीलन,' ‘स्पार्क' आणि ‘नॅशनल स्लम ड्वेलर्स फेडरेशन' या तीन संघटनांनी पदपथवासियांना हक्काची घरे मिळण्यासाठी उभारलेल्या प्रयत्न मालिकेवर आधारित एकूण 34 भागांची रेडिओ मालिका तयार केली. ‘अपना स्ट्रीट' हे त्या मालिकेचे शीर्षक होते. जगभरातील नामांकित आकाशवाणी माध्यमसंस्थांनी या मालिकेचे प्रसारण केले. ‘महिला मीलन'शी त्यावेळी जुळलेला ज्युलियनचा स्नेहबंध मालिका प्रसारणानंतर संपुष्टात आला नाही. पुढच्या जवळपास 25 वर्षांच्या या चळवळीचा अथक प्रवास ज्युलियन आणि त्याची सहधर्मचारिणी मार्टिन अशा दोघांनी आत्मीयतेने न्याहाळला. या साऱ्या अनुभवाचे दस्तावेजीकरण ज्युलियनने 2008 मध्ये हाती घेतले. आकाशवाणी कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या 34 भागांचे ध्वनिमुद्रण, ‘स्पार्क'च्या कार्यालयातील विपुल संदर्भ साहित्य, ‘महिला मीलन' या संस्थेतील अनेकानेक सदस्यांच्या आठवणी-मुलाखती, मार्टिनने कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले या प्रवासादरम्यानचे अगणित क्षण, ज्युलियनने टिपून ठेवलेली स्मरणचित्रे, नोंदी... अशा नानाविध संदर्भ साहित्याच्या कुशीतून हा ग्रंथ साकारलेला आहे. त्याचे अंतरंग सधन आणि समृद्ध बनलेले आहे, ते या सगळ्या साक्षेपापायीच.
‘अपना स्ट्रीट' हा दस्तावेज अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. रोजीरोटीच्या शोधार्थ शहरांकडे वळणारे कष्टकरी, महानगरामधील असंघटित क्षेत्रातील त्यांचे सामावून जाणे, शहरी जमिनीची बाजारपेठ, त्या बाजारपेठेचे अर्थकारक आणि राजकारण, तिच्यातील हक्कदार, दावेदार आणि स्पर्धक, पदपथवासियांच्या निवाऱ्याचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी, शहरी संघटित-असंघटित उद्योगव्यवसाय क्षेत्रांचे परस्परपूरक असे परस्परावलंबन, शासनाची भूमिका... असे अक्षरश: अगणित आणि एकमेकांत गुंफलेले शहरविकासाचे प्रश्न या शब्दांकनाद्वारे आपल्या विचारांच्या कक्षेत साकारतात.
हे शब्दांकन केवळ संघर्षाचे नाही. आपल्या मुलाबाळांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी अविरत झगडणाऱ्या ‘महिला मीलन' च्या सदस्या महिलांचे जे सक्षमीकरण या सगळ्या प्रक्रियेमधून होते, त्या सक्षमीकरणाचा कशिदा, बारीकसारीक तपशिलासह भरणे, हे या दस्तावेजाचे सर्वांत मोठे यश आहे. प्रखर लढा उभारूनही, एक वेळ, घर मिळाले नाही तरी एक सक्षम, धारदार आत्मभान लाभलेली, समाजव्यवहारात सर्व स्तरांवर आत्मविश्वासपूर्वक निर्णय घेणारी, बचतगटांच्या माध्यमांतून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनलेली स्त्री या संघर्षयात्रेतून कशी उभी राहते, ती सारी या ग्रंथातील प्रक्रिया बारकाईने अभ्यासण्यासारखी आहे. स्त्री-प्रश्नांचे अभ्यासक, माणूसकेंद्री विकासासाठी आग्रहशील असणारे कृतिशील विचारवंत, शहरी प्रश्नांचे संशोधक आणि सजग समाजाभ्यासकांनी आवर्जून वाचावा असाच हा ग्रंथ आहे.

संगणक येती घरा (संगणक... इंटरनेट... सब कुछ)

मार्मिक, 17 जुलै 2011
सध्या मुलांना 5 व्या इयत्तेपासून संगणक आवश्यक केल्यामुळे आता ज्या घरात शिक्षण घेणारी मुले आहेत तिथे संगणक आणि इंटरनेट या गोष्टी दाखल झाल्या आहेत. या दोन गोष्टी घरात आल्यामुळे माणूस घरबसल्या काय काय करू शकतो हे सामान्य माणसाला माहीत नसते. पण नेटसह संगणक हा माणसाचा फार महत्त्वाचा मदतनीस बनू शकतो. अफाट माहिती बसल्याजागी मिळू शकते. कित्येक व्यवहार घरातून बाहेर न पडता करता येतात. शेकडो गाणी ऐकता येतात. चित्रपट, रेल्वे, एस.टी. यांची तिकिटे बुक करतात वगैरे वगैरे वगैरे संपणार नाहीत इतक्या गोष्टी या दोन मित्रांच्या सहाय्याने करता येतात. त्या कोणत्या, त्या कशा करायच्या याची इत्थंभूत माहिती एका लहानशा पुस्तकात मिळाली तर काय छान होईल! खरोखरच असे पुस्तक एका तज्ज्ञाने लिहिले आहे. त्यातला एक उतारा.
के.पी.ओ. अर्थात नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग क्षेत्राची क्षमता व विस्तार अजून तेवढ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये झालेला दिसत नाही. परंतु येणाऱ्या काळात बी.पी.ओ. प्रमाणेच  के.पी.ओ. देखील संधीचे नवे दालन स्थानिक तरुणांना खुले करून देईल, यात शंकाच नाही.
अलीकडील वर्षात अर्थव्यवस्थेत होत असलेल्या वाढीमुळे उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाची तसेच नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प विकसित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऊर्जा, रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळे आणि रस्ते दळणवळण यांसारख्या पायाभूत क्षेत्रांच्या विकासाची उभा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर विजेच्या मागणीमुळे पुरवठा व मागणी यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी दूरगामी परिणाम करणारी चिंतेची बाब आहे. अपारंपरकि ऊर्जा स्रोताकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे.
उपलब्ध वीजनिर्मिती क्षमतेत वाढ करणे, अस्तित्वात असलेल्या निर्मिती व वितरण व्यवस्थेतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण आणि विजेच्या अनधिकृत वापरावर प्रतिबंध घालणे इ. वर लक्ष केंद्रित केले तर भविष्यामध्ये ऊर्जा समस्येतून महाराष्ट्राला मुक्ती मिळेल.
वाढता ऊर्जा वापर हा उद्योगक्षेत्राचा कणा आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. तेव्हा विजेचा सुयोग्य वापर होणे व वीज गळती रोखणे इ. सारखी जागरूक नागरिकांची कर्तव्ये जरी आपण तत्परतेने केली तरी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचत होईल.
ऊर्जानिर्मिती व विकास याबरोबरच आधुनिक अर्थव्यवस्थेत परिवहन ही महत्त्वाची पायाभूत सुविधा असून अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्याचा प्रभाव जाणवतो. परिवहन यंत्रणा ही विविध पर्याय व सेवा यांनी युक्त असून त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, जल आणि हवाईमार्ग यांद्वारे होणाऱ्या वाहतुकीचा समावेश होतो.
तेव्हा औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील व महत्त्वाच्या शहरांना वरील मार्गांनी जोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केल्यास विकासाची गंगा सर्व महाराष्ट्र व्यापेल यात शंकाच नाही.
कुठल्याही क्षेत्राचा विकास हा फक्त काही लोकांच्या हस्तक्षेपांमुळेच होतो, असे नाही. त्यासाठी समाजाच्या विविध स्तरांचे पाठबळ, प्रत्यक्ष सहभाग व माहिती-ज्ञानाची देवाणघेवाण यांचादेखील समावेश असतो, सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यामध्ये भारतीय भाषांप्रमाणेच (इंग्रजीसह) स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन व इतर परकीय भाषांचे  अभ्यासक्रम जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले, तर खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर तांत्रिक सुविधा पुरवण्यामध्ये महाराष्ट्र सॉफ्टवेअर जगतामध्ये उद्याचा तारा असेल.
भारत हा कृषिप्रधान म्हणून संबोधला जाणारा देश. आजही सुमारे 60% जनता ही शेती व तत्सम उद्योगांवर अवलंबून आहे. गेल्या दशकात भारतीयांच्या कर्तृत्वाबद्दल जगात सर्वत्र आदराची भावना आहे. वृद्ध होत चाललेले विकसित देश, तरुणाईचा पाया असलेल्या भारतावर अवलंबून राहणार आहेत. एकविसाव्या शतकात ‘संगणकसाक्षरता' एक अत्यावश्यक घटक ठरत आहे. ‘रोटी, कपडा, मकान, मोबाईल, बिजली' बरोबरच इंटरनेट बॅंडविड्थ लवकरच अत्यावश्यक मानवी हक्कात गणली जाईल. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 50 वर्षे झाली आहेत. महाराष्ट्र हे जर सायबर राष्ट्र झाले तर कौशल्यावर आधारित रोजगारनिर्मिती सहज शक्य होईल. मानवी साधनसंपत्तीचा जर आपण योग्य रीतीने वापर केला तरच आपण 8% विकासाचा टप्पा गाठू शकू. त्यासाठी काही गोष्टी आपल्या शिक्षणपद्धतीत अंतर्भूत कराव्या लागतील. उदा. बहुभाषिक कौशल्ये (परदेशी भाषा संभाषण व लेखन), गणित/ तर्कशुद्ध विचारसरणी, दर्जा व शिस्त, जागतिक कार्यसंस्कृती/ व्यावसायिकता.
त्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावरून भाषा, तंत्रे आणि करिअरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या जागरूक नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी Ms-CIT सारख्या कोर्सेसची मदत होईल. तसेच संस्थात्मक पातळीवर संशोधन व विकास यामध्ये काम करणाऱ्या MKCL, C-DAC यांसारख्या संस्थांची मदत घेऊन छोट्या शहरांबरोबरच गावागावांमध्ये संगणक साक्षरता व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरातून दैनंदिन काम करणे, शेतीविषयक अद्ययावत माहितीचा आढावा घेणे इ. सारखे उपक्रम राबविता येतील.
औद्योगिक तसेच परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य दिमाखाने पहिल्या पंक्तीत दरवर्षी असते. तेव्हा महाराष्ट्र सरकारने संगणक लोकप्रियता वाढविण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण खाते, माहिती व जनसंचालनालय यांसारख्या प्रभावशाली यंत्रणांच्या माध्यमातून बदलत्या काळासाठी महत्त्वाच्या योजना राबवाव्यात.
महाराष्ट्राचा इतिहास, साहित्य, संस्कृतीकडे पाहिले असता जागतिक साहित्यिक मूल्यांना गवसणी घालेल असा दर्जा, उंची महाराष्ट्राच्या मातीतील कसदार लेखणीने गाठलेली आहे. तेव्हा अशा साहित्यिक कृतींचे E-Book मध्ये रूपांतर करून लेखक, प्रकाशक व ग्राहक यांचा इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष व जागतिक बाजारपेठेच्या मार्गाने संवाद साधणे शक्य होईल.
गतिमान समाजव्यवस्था, बदलती जीवनशैली व बदलते मानवी संबंध यांच्या परस्पर प्रभावातून सोशल नेटवर्किंग साईट्स, सर्च इंजिन्स, विविध वेबसाईट्स, सॉफ्टवेअर्स यांच्या वाढत्या वापराने भाषा, संस्कृती अधिक वृद्धिंगत होत आहे, तर मानवी जीवन अधिकच आरामदायी व सुखकर होत आहे.
तेव्हा या बदलांना समोर ठेवून त्यांची सर्वसमावेशकता विस्तारित करून संगणक हा रोजच्या मित्रांमधील एक इतका परिचित.
असाध्य ते साध्य । करिता सायास ।। कारण अभ्यास । तुका म्हणे ।।
तेव्हा सर्वांच्या भगीरथ प्रयत्नांतून सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला भारतीय संगणक उद्योगाचा मुकुटमणी म्हणून स्थापित करण्याचा व त्यासाठी अथक भगीरथ प्रयत्न करण्याचा संकल्प या निमित्ताने सोडूया.

मुलांना कसं वाढवावं?

साप्ताहिक सकाळ, 11 फेब्रुवारी 2012,
सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालकांना आपली मुले हुशार व यशस्वी व्हावी, असे वाटत असते; मात्र मुलांना वाढवताना, त्यांचे संगोपन करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी काय करावे, मुलांना कसे घडवावे याबद्दल मार्गदर्शन करणारे ‘टेन लॉज ऑफ लर्निंग' हे पुस्तक आहे. हल्ली पालकांना कठीण प्रसंगात उपयोगी पडतील, आठवतील अशा साध्या सोप्या नियमांच्या संचाची गरज असते, सर्वांना लागू पडतील, असे दहा नियम या पुस्तकात दिले आहेत. शाळेच्या आवारात मुले जितकी शिकतात, तितकीच ती बाहेरच्या गोष्टींमधूनही शिकत असतात. अधिकाधिक वेळ मुले पालकांसोबत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मुलांवर चांगले-वाईट संस्कार होत असतात. हे पुस्तक मुलांबरोबरच पालकांनाही नियमांचे पालन करण्याचा हल्ला देते. मार्गदर्शक ठरतील, अशी उदाहरणे केस स्टडीजच्या माध्यमातून या पुस्तकात देण्यात आलली आहेत. त्याशिवाय हमखास पडणारे काही प्रश्न, मुलांना शिकवताना उपयोगी पडेल अशी विशेष माहितीही या पुस्तकात दिलेली आहे.
10 लॉज ऑफ लर्निंग, स्टीव्हन रुडॉल्फ, अनुवाद :अश्विनी लाटकर, अमेय प्रकाशन, पुणे, पाने :174, किंमत :199 रुपये.

सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे यांचे कार्य उपेक्षितांसाठीच

दै. सकाळ, पुणे, रविवार 6 ऑक्टोबर 2013
'एका संघर्षाची वाटचाल' पुस्तक प्रकाशनप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे गौरवोद्गार
पुणे. ता. 5 : ''राज्याने अनेक मुख्यमंत्री पाहिले, परंतु सुशीलकुमार शिंदे यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम केले,’’ असे गौरवोद्गार सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले. निमित्त होते. 'अमेय प्रकाशन'च्या 'सुशीलकुमार शिंदे - एका संघर्षाची वाटचाल'या पुस्तकाच्या प्रकाशनाचे.
ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पुस्तकाचे लेखक डॉ. पी. आर. सुबास चंद्रन, अनुवादक संतोष शेणई उपस्थित होते. शिंदे हे सर्वांना सोबत घेणारे, उत्तम प्रशासक, उपेक्षितांना न्याय देणारे आणि कणखर नेते असून, त्यांच्यावरील हे पुस्तक म्हणजे लोकशाहीची यशस्वी वाटचाल असल्याचे पाटील म्हणाले.
ते म्हणाले, ‘‘आयुष्य हाच एक संघर्ष आहे. या संघर्षातील यशातून मिळणाऱ्या आनंदामुळेच शिंदे यांचा चेहरा नेहमी हसरा आहे. त्यांनी कधी स्वतःचा किंवा कुटुंबाचा विचार केला नाही. उपेक्षित वर्गालाच त्यांनी सतत आपल्या कामाचा केंद्रबिंदू मानले’’
शिंदे यांनी स्वप्ने पाहून ती प्रयत्नपूर्वक साकार केल्यानेच ते उच्च पदापर्यंत पोचल्याचे टिकेकर यांनी सांगितले. ध्येयाने प्रेरित होऊन त्याची पूर्ती करणाऱ्यांची अशी अत्यंत थोड़ी उदाहरणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘डॉ. नी. त्र्यं. पुंडे आणि प्रा. श्रीराम पुजारी या शिक्षकांमुळे शिंदे यांना साहित्य, संगीत, कला या क्षेत्राची गोडी लागली.’’