मिशन काश्मीर

स्कार्दूचा वेढा

दै. सामना, साहित्य विश्व, रविवार, 20 जून 2010
 ‘काश्मीर'च्या इतिहासाचा व स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळातील तेथील राजकीय घडामोडींचा नव्याने वेध घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी यांनी लिहिलेल्या ‘मिशन काश्मीर' या अमेय प्रकाशन प्रसिद्ध करीत असलेल्या आगामी पुस्तकातील काही निवडक भाग. 23 जून रोजी प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. 1948 साली तब्बल 431 दिवस चालेलल्या यृद्धाची रोमहर्षक कहाणी, काश्मीर वाचविण्यासाठी प्राणपणाने लढलेले, प्राणांची आहुती दिलेले अनेक ज्ञात-अज्ञात वीर यांची कहाणी सांगत असतानाच काश्मीर प्रश्न धोरणकर्त्यांनी कसा चिघळवला, दहशतवादाची पाळंमुळं तिथं कशी रुजली याचा अस्वस्थ करून टाकणारा तपशील कथन करणारे हे ‘मिशन काश्मीर!' लेफ्ट. कर्नल थापा यांच्या संदेशानंतर 11 एप्रिल रोजी 163, ब्रिगेडने मेजर काउटसला तातडीने स्कार्दूकडे जाण्याचा आदेश दिला. यानंतर श्रीनगरहून निघालेली पहिली तुकडी कारगिलमध्ये प्रवेश करत होती. दुसरी तुकडी द्रासजवळ होती. तिसरी मटायनजवळ तर चौथी व पाचवी घुमरीजवळ होती आणि सहावी तुकडी श्रीनगरहून निघण्याच्या तयारीत होती. स्कार्दूकडे जाणाऱ्या या तुकड्यांच्या दोघा अधिकाऱ्यांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले. मेजर काउटस व लेफ्ट. कर्नल कृपालसिंग यांच्यातील मतभेदानंतर स्कार्दू वाचविण्याच्या मोहिमेची जबाबदारी कृपालसिंगकडे सोपविण्यात आली. मधल्या काळात स्कार्दू तळाची स्थिती खालावत होती. तळावरील दारूगोळा, औषधे यांचा साठा संपत आला होता. लेफ्ट. कर्नल थापाने स्कार्दूची मोर्चे बांधणी बळकट केली होती. स्कार्दूचा तळ 1350 मीटर लांब तर 550 मीटर रूंद होता. थापाने या तळाकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गाला रोखून धरता येतील अशा प्रकारे तळावरील मोर्चे लावले होते. तळावरील बंकर खोल होते. त्याच्या छतावर भरपूर माती टाकून शत्रूचा उखळी तोफांचा मारा निष्प्रभ करण्याचा प्रयत्न थापाने केला होता. थापाची मुख्य अडचण दारूगोळ्याची होती. तळावरील मर्यादित दारूगोळा विचारात घेऊन त्याला मर्यादित वापर करावा लागत होता. श्रीनगरमध्ये डिव्हिजन मुख्यालयात असलेल्या मेजर जनरल थिमय्या यांना स्कार्दूतील परिस्थितीची कल्पना आली. त्यांनी स्कार्दूवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. स्कार्दू तर गेले आता कारगिल तरी वाचवावे असा निर्णय थिमय्यांनी घेतला. तसा आदेश त्यांनी जरी केला. थापाने स्कार्दूतून बाहेर पडून मरोलकडे कूच करावे. तेथे त्याला लेफ्ट. कर्नल कृपालसिंगने भेटावे असा आदेश जारी झाला. स्कार्दूतून बाहेर पडून 128 कि.मी. वरील मरोलला जाणे अशक्य आहे, कृपालसिंगनेच स्कार्दूत यावे, असे थापा सांगत होते. तर कृपाल सिंगला हे शक्य नव्हते. थापा श्रीनगरकडे रसद-दारूगोळा मागत होता; पण त्याला मिळत होती फक्त आश्वसाने. दरम्यान कृपालसिंगचेही पथक उद्ध्वस्त झाल्याची बातमी स्कार्दूत पोहोचली आणि थापा व त्याच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. 17 जून रोजी घुसखोरांनी थापाकडे शरण येण्याचा संदेश पाठविला. जम्मू-काश्मीर इन्फन्ट्रीचा शिपाई अमरनाथसोबत कर्नल शहजादने हा संदेश पाठविला होता. घुसखोरांनी अमरनाथला पारकुट्टात पकडले होते. हा संदेश थापाने फेटाळून लावला. दोन दिवसांनी 19 जून रोजी रॉयल भारतीय वायुदलाची दोन टेंपेस्ट विमाने स्कार्दूच्या आकाशात दिसली. दुसऱ्या दिवशीही या विमानांनी घुसखोरांवर पुन्हा हल्ला चढविला. यामुळे स्कार्दूत उत्साह संचारला. पण तो फार काळ टिकला नाही. कारण त्यानंतर दोन आठवडे काहीच झाले नाही आणि स्कार्दूतील अन्नधान्याचा साठा संपत आला होता. वास्तविक टेंपेस्ट विमाने ही काही रसद पुरविण्यासाठी नव्हती. तेथे त्यांना घुसखोरांवर हल्ले आणि स्कार्दू तळाला रसदपुरवठा ही दोन्ही कामे करावी लागत होती. विमानातून टाकण्यात आलेली काही रसद स्कार्दू तळाच्या बाहेर पडून ती घुसखोरांच्या हाती पडत होती. 8 जुलै रोजी स्कार्दूतील सारे अन्नधान्य संपले होते. थापाने तातडीचा संदेश पाठविला. त्याच दिवशी विमानातून अन्नधान्याची सहा पिंपे टाकण्यात आली. यातील दोन नदीच्या पात्रात पडली. स्कार्दूची दररोजची गरज 360 किलोग्रॅमची होती. जुलै संपला. उन्हाळा सुरू झाला. चेरीच्या वृक्षांना पालवी फुटू लागली. स्कार्दू खोऱ्याच्या दगडी पार्श्वभूमीवर ही कोवळी हिरवी पालवी उठून दिसत होती. निसर्गात नवजीवन संचारले होते. पण स्कार्दूच्या किल्ल्यात अडकलेल्या 600 लोकांच्या जीवनातील चैतन्य जणू संपत आले होते. दररोज गव्हाचा दोन चपात्या व एक कप चहा यावर या लोकांना दिवस काढावे लागत होते. कुपोषणाचे परिणाम दिसू लागले होते. किल्ल्यातील लोक हाडामांसाचा सापळा झाले होते. स्कार्दूचा वेढा सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला होता. 7 ऑगस्ट रोजी भारतीय वायुदलाच्या दोन टेंपेस्ट विमानांनी अन्नधान्याचे दोन पिंप टाकले. थापा व त्याच्या सहकाऱ्यांजवळील शस्त्रास्त्रे संपत आली होती. प्रत्येक जवानाजवळ फक्त दहा काडतुसे शिल्लक राहिली होती. आणि त्यांना युद्ध लढवायचे होते. युद्धाचा शेवट जवळ आला होता. शेवटचा मार्ग म्हणून किल्ल्यात अडकून राहिलेल्या लोकांनी दोन-तीनच्या गटाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यात राहून मरणाची हमी होती तर बाहेर पडताना जगण्याची संधी होती. अंधारात बाहेर पडतानाही मृत्यू गाठण्याची शक्यता होती. मृत्यूला हुलकावणी देण्याच्या इराद्याने लोक रात्रीच्या अंधारात बाहेर पडू लागले. 12 ऑगस्ट रोजी पाकच्या कर्नल शहजादने थापाला संदेश पाठविला. ‘स्कार्दू तळाला मदत करण्याचे ब्रिगेडियर फकिरसिंग, लेफ्ट. कर्नल कृपालसिंग, संपूर्णबचनसिंग यांचे प्रयत्न फसले आहेत. तुम्ही एखाद्या सैनिकाला शोभेल असा संघर्ष केला आहे. आता आमच्याशी संघर्ष करण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. तुम्ही शरण यावे अशी विनंती मी करीत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी केवळ सैनिकच नाही, माझ्या नसानसात शाही रक्त आहे. त्या रक्ताची शपथ घेऊन मी तुम्हाला सुरक्षेची हमी देत आहे. तुमच्याच एका जवानाला मी पांढरे निशाण घेऊन पाठवीत आहे. तुम्ही शरणागतीस तयार असल्यास हे पांढरे निशाण तुमच्या अधिकाऱ्याला देऊन त्याला आमच्याकडे पाठवा.‘ लेफ्ट. कर्नल शेरसिंग थापाने या संदेशास कोणतेही उत्तर दिले नाही. स्कार्दू तळावरील स्थिती पार कोसळली होती. शस्त्रास्त्रांचा साठा संपला होता. थापाचा संघर्ष संपणार होता. थापा व त्याच्या सहकाऱ्यांनी उपाशीपोटी युद्ध लढले होते. पण दारूगोळा संपल्यानंतर त्यांच्याजवळ शरणागती हाच पर्याय शिल्लक उरला होता. 14 ऑगस्ट उजाडला हा पाकिस्तानचा पहिला वर्धापनदिन. थापाजवळ फक्त 4 अधिकारी, 35 जवान व मोजकी काडतुसे शिल्लक राहिली होती. सकाळी आठ वाजता लेफ्ट. कर्नल थापाने स्कार्दूतून श्रीनगर मुख्यालयाला शेवटचा संदेश पाठविला. त्यानंतर थापाने बिनतारी यंत्र अबोल झाले. स्कार्दू कोसळले होते.

भावयात्रा... काव्यमय चिंतन...

पुस्तक परिचय

नरेंद्र मोदी यांच्या कणखर राजकीय व्यक्तिमत्त्वाआड निसर्गात रमणारा एक संवेदनशील कवी आहे. वृक्षवल्लींना सोयरे मानणाऱ्या, पाखरांसवे गाणी गाणाऱ्या, फुलांसंगती फुलणाऱ्या या कवीची भावयात्रा गुजरातची जीवनदायिनी असलेल्या नर्मदेपासून थेट हिमालयापर्यंत चालते. एकूण 66 कवितांच्या या काव्यसंग्रहात समावेश आहे. निसर्गाचं अनावर आकर्षण असलेली अशी ही भावयात्रा आहे. भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाची निर्मिती करणाऱ्या ऋषींनी आपली जीवनविषयक विचारसूसत्रं निसर्गातून घेतली आणि निसर्गातील प्रतिमांसह ऋचांमधून मांडली. भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानावर गाढ श्रद्धा असलेले नरेंद्र मोदी आपल्या काव्यमय चिंतनातून निसर्गातील प्रतिमा घेतच आपली जीवनविषयक विचारसूत्रं मांडत आहेत. भावनेने ओंथबलेला अन् विचारांचा प्रभाव असलेली अशी ही चिंतनशील भावयात्रा आहे. कवीला नर्मदेच्या पाण्याचं खळाळतं गाणं रुचतं आणि हिमालयाचं श्वेत मौनही भावतं म्हणूनच कवी नर्मदेसारखा प्रवाही आहे अन् हिमालयासारखा स्थिर. निसर्गाने दिलेल्या आत्मविश्वासाचं बळ कवीच्या प्रत्येक शब्दात आहे ‘तुम्ही मला छायाचित्रात या पोस्टरमध्ये शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका. मी तर मांडी घालून बसलोय माझ्या आत्मविश्वासात, माझ्या वाणीत, वर्तनात. तुम्ही मला माझ्या कार्यानेच ओळखा. कार्य हेच माझं जीवन-काव्य.' चिंतनशील भावयात्रा नरेंद्र मोदी हे नाव राजकीय क्षेत्राशी घट्ट जुळलेलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी तब्बल तीन वेळा सांभाळणाऱ्या मोंदींनी विकासाभिमुख आणि सामान्य जनतेच्या हिताच्या प्रशासनाची एक नवीन दिशा स्वतःच्या नेतृत्वातून दाखवली. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रखर विचारांमुळे सतत चर्चेत असणारा हा नेता जनताजनार्दनाच्या पसंतीस उतरला आहे. राजकीय क्षेत्रात धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या मोदींच्या कणखर व्यक्तिमत्त्वाची एक संवेदनशील बाजूही आहे. उत्तम गुणग्राहक, वाचक व वक्ता असणारे मोदी प्रभावी लेखक आणि कवीसुद्धा आहेत. त्यांच्या कवितांचा संग्रह अमेय प्रकाशनतर्फे प्रकाशित होतोय, भावयात्रा! निसर्गचित्रं, मानवी भाव-भावना, भोवतालच्या घडामोडी यांविषयीचं हे काव्यमय चिंतन आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्यापूर्वी अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मोदींनी मोठं कार्य केलं आहे. त्यांनी भरपूर प्रवास केलाय. सामाजिक क्षेत्रातल्या गुंतागुंतींच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. मानवी स्वभावधर्माचे कंगोरे त्यांना नेमकेपणाने उमगतात. निसर्गाच्या विविध कलात्मक आविष्काराचा रसास्वाद घेण्याची सौंदर्यदृष्टी त्यांच्याजवळ आहे. मुख्य म्हणजे जे मनाला भावतं, सभोवताली जे जे चांगलं आहे, त्याला मनःपूर्वक दाद देण्याची गुणग्राहक वृत्ती त्यांच्यापाशी आहे. या साऱ्याचा उत्तम मिलाफ भावयात्रामध्ये घडून आलेला दिसतो. आपल्या मनोगतात जरी त्यांनी मी मुरलेला कवी नाही असं म्हटलंय, तरीही त्यांचं हे काव्यमय चिंतन वाचकांशी संवाद साधण्यात पूर्णत: यशस्वी होतं. या कवीची भावयात्रा गुजरातची जीवनदायिनी असलेल्या नर्मदेपासून थेट हिमालयापर्यंत चालते. निसर्गाचं अनावर आकर्षण असलेली अशी हा भावयात्रा आहे. जीवनाचा प्रत्येक पैलू समजून घेण्याची, त्याचा मनापासून आस्वाद घेत त्याविषयी कृतार्थता मनी बाळगण्याची तरल भाववृत्ती त्यांच्या काव्यात दिसून येते. आकाश भव्य, सुंदर अन् वसुंधराही मनोहर नभी विलसते इंद्रधनु अन् रंगांची हवेत उधळण कोणत्या जन्माची ही पुण्याई झालो आयुष्यात कृतार्थ! संग्रहातल्या पहिल्याच कवितेत आयुष्याप्रतीची आणि या निसर्गाच्या अद्भुत रुपाबद्दलची कृतार्थता त्यांनी व्यक्त केली आहे. निसर्गामध्ये कवी जसा रमून जातो, बाग, जंगल, फुलं, नदी सागर, पहाड, पक्षी हे त्यांना जसा आनंद देतात; तसेच हाच निसर्ग त्यांच्या कार्याची, त्यांच्या खंबीर व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे, हेही जाणवतं. म्हणूनच सृष्टी या आपल्या कवितेत ते म्हणतात, आकाश स्वतःच्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतोय रोंरावणारा सागर.. माझी प्रेरणामूर्ती कोणीही किनारा गाठावा असा हा सागर नव्हे आव्हान स्वीकारायची आपली ताकद असेल. तरच आपल्या हातांना प्रयत्नांचे फूल लाभेल.. मोदींच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येतं, आव्हानं, धाडस, विरोध यातून सतत तावूनसुलाखून निघालेलं हे व्यक्तिमत्त्व आहे. म्हणूनच ते ‘स्वप्नांचा शुभशकून’ या कवितेत समर्पकपणे म्हणतात, इंद्रधनुष्यासम मजपाशी स्वप्ने आहेत; पण ही स्वप्ने रोमॅण्टिक नव्हेत तर आहेत तापल्या आयुष्याचे देणे आपलं आयुष्य समाजासाठी, सामान्य जनतेसाठी... समाजातल्या सर्वांत शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी आहे. विकासपथावर प्रगतिशील पालं टाकत असताना मातृभूमीच्या प्रति असणारी निष्ठा व श्रद्धा अधिकाधिक दृढ होत जायला हवी, हा त्यांचा संस्कार आहे, म्हणूनच आयुष्यातलं शिवम् आणि सुंदरम् अनुभवतानाच सत्याची कास त्यांच्यातला कवी कधीच सोडत नाही. देशाभिमान, हिंदू, हिंदू मंत्र, वंदे मातरम्, करा विजय संपादन, अभिमान, वीरा ऊठ अशा अनेक कवितांतून त्यांचं सच्चे देशाभिमानी नेतृत्व दिसून येते. आपल्या 'कारगिल' या कवितेत अस्वस्थ भावना व्यक्त करताना ते म्हणतात, कारगिल आधीही गेलो होतो टायगर हिलला आधीही बघितले होते राजाधिराजाचे श्वेत मौन... आज... बॉम्ब, बंदुकीच्या आवाजाने प्रत्येक शिखर गरजतेय, बर्फाच्या कड्यांवर धगधगत्या विस्तवाप्रमाणे सेनेचे जवान झगडताहेत... देशासाठी, जनतेसाठी लढणाऱ्या जवांनापुढे कवी नतमस्तक होतात. ते म्हणतात, धगधगत्या विस्तवासम वीर जवानांच्या श्वासांनी वितळणारा बर्फ निर्झर बनून वाहत होता, त्या निर्झराच्या आवेगात सामावलेय सुजलाम् सुफलाम् भारताचे स्वप्न अन् निर्झराच्या कुशीतून उमटतंय् गान वंदे मातरम् मोदींच्या या भावयात्रेत त्यांच्या व्यक्तिमत्वातील संवेदनशील आणि कणखर वृत्तीचा मिलाफ आहे. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची निर्मिती करणाऱ्या ऋषींनी आपली जीवनविषयक विचारसूत्र निसर्गातून घेतली आणि निसर्गातील प्रतिमांसह ऋचांमधून मांडली. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानावर गाढ श्रद्धा असलेले नरेंद्र मोदी यांनी आपल्या या काव्यमय चिंतनात निसर्गातील प्रतिमा घेतच आपली विचारसूत्रे मांडली आहेत. म्हणूनच ही भावयात्रा भावनेने ओथंबलेली आणि विचारांचा प्रभाव असलेली... चिंतनशील अशी बनली आहे. एका कवितेत ते म्हणतात, अखेरीत आरंभ अन् आरंभात अखेर शिशिरात - पानगळीत वसंताचा हुंकार अंतःतून नवा आरंभ होतो. शिशिर ऋतूतल्या पानगळीनंतरच बहाराचा वसंत ऋतू येतो, म्हणूनच अंताची, निराशेची भीती न वागळता, सतत भविष्यातल्या बहाराची आस मनात हवी, हे शाश्वत सत्यच मोदी सहज शब्दांत सांगून जातात. एका अर्थाने ही भावयात्रा मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यांच्या विचार-आचारांचं सारच सांगते. नर्मदेसारखं प्रवाही आणि हिमालयासारखं स्थिर व्यक्तिमत्त्व लाभलेले ते कवी आहेत. त्याचं व्यक्तिमत्त्व अन् विचार पारदर्शी आहेत. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं आव्हान स्वीकारणं हे ते कर्तव्य मानतात. आपल्या मनोगतात मोदींनी वाचकांना विनंती केलीय की, या कवितेच्या रूपापेक्षा त्यातला भाव समजून घ्या. या सर्व कविता रचनेच्या दृष्टीने सर्वोत्तम असतीलच असे नाही. पण जसा कच्च्या कैरीचा स्वाद अवीट असतो, तसेच या रचना वाचताना जाणवेल. आणि खरोखरच हा सर्व रचनांमधला आंतरिक भाव वाचकांच्या हृदयाला भिडतो. एकूण विचार केला, तर अस्वस्थ वास्तव मांडणारी मोदींची कविता आशेचेही गाणं गाते, या कवितेत एक ऊर्मी आहे, चेतना आहे, ती वाचकाला भावी काळ अंधारमय नाही, तर तेजाचा आहे, हा विश्वास देते अन् त्यासाठी आजच्या आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्यही! ‘आँ आँख धन्य छे' या मूळ गुजराती कवितासंग्रहाचं हे मराठी भावरूपांतर आहे. ‘तरुण भारत’मध्ये उपसंपादक असलेले विलास कुलकर्णी यांनी हे रूपांतर समर्पकपणे केलं आहे. मोदींचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची, त्यांची संस्कार व चिवारधारा समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ही भावयात्रा वाचलीच पाहिजे. उल्हास लाटकर भावयात्रा, लेखक - नरेंद्र मोदी, अनुवाद - विलास कुलकर्णी, प्रकाशक - अमेय प्रकाशन, पुणे. किंमत - 250 रु.

अर्थपूर्ण भावयात्रा

सामना, उत्सव, रविवार, 27 ऑक्टोबर 2013
कार्य हेच ज्यांच्या जीवनाचे काव्य आहे, अशा कवीला शोधायचे कुठे? अर्थात त्याच्या काव्यातच तो गवसतो. ‘भावयात्रा' हा अप्रतिम काव्यसंग्रह आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचा! कच्च्या कैरीच्या आंबटगोड अवीट चवीसारख्या या काव्याचा आस्वाद घेताना छंदोरचनेपेक्षा भावभावनेचा फुलोरा महत्त्वाचा आहे. हे त्यांच्या ‘मनोगता'त त्यांनी व्यक्त केलेले विचार वाचकांस पटतात- अंधुक स्मरणदिवा अंधार दिशांना दाही, अंधार संपवू म्हणता- संपता संपत नाही अज्ञानाचा आणि अन्यायाचा काळोख सर्वत्र पसरलेला पाहून कवीचे नैराश्य कवितेत व्यक्त होते, तेव्हा स्मरणावर, आठवणींवर जगणारा माणूस ऊनसावलीच्या खेळात कधी रमतो तर कधी वास्तवतेने वर्तमानात किती वैतागतो हे सामान्य वर्गास नेहमीच अनुभवास येते. परंतु सामान्यांमधला कवी जेव्हा समंजसपणे हे कठोर सत्य स्वीकारतो, तेव्हा वाहत्या नदीप्रमाणे उमटतात ईश्वरीय गाण्याचे सूर तेव्हा अकराव्या दिशेला लाभते नादमय संगीत. त्यातूनच वैश्विक प्रेमाचा साक्षात्कार होतो... पाण्याच्या बंधनासम बांधू म्हटले तरी बंधनात राहत नाही... कोणी बंधने टाकलेली मला आवडत नाही नंतरच्या सं-बंधात मन माझे रमत नाही! बंध-संबंधातील अदृश्य सीमारेषेवर रेंगाळणारे प्रेमवेडे मन मायामोहात गुंतले तरी कोऱ्या कागदावर ‘आतून' बाहेर येणारे विचार केवळ विचार न राहता तत्त्वाचे ज्ञान घेऊन शब्दरूपात अवतरतात. मग मिळते एक शीतल छाया त्या अनामिकाची आणि पडछायेचे पांघरूण मनावर ओढून स्वप्नांच्या प्रदेशात कवी भटकंती करीत राहतो. ‘व्यथेला वाहू द्या अन् वाट करून द्या अश्रूंना!' असे तो म्हणतो. धागा बांधला जातो, तुटू नये म्हणून फुलपाखरू जाते पुन्हा रंगात बुडून! निसर्गाशी मोदींची खूप जवळीक आहे हे ‘भावयात्रे'तून लक्षात येते- सकाळचा वृक्ष खुशीत, दुपारचा यौवनाच्या उन्मादात. सायंकाळचा समजूतदार, मला माझ्या रोमारोमात जाणून घ्यायचा आहे' असे ते म्हणतात, तेव्हा त्यांना आपल्या अस्तित्वाचा पर्याय वृक्ष असला तरी त्याचे रहस्य जाणून घेण्याची ही काव्यमय धडपड सुंदर आहे. ज्यांच्या आयुष्याच्या होडीचे वल्हे जिंदादिली आणि दरियादिली आहे. ते अवघे अंबर कवेत घेऊ पाहतात. अगणित माणसांच्या सागराला ते हिरवीगार सृष्टी समजतात. एवढेच नाही तर त्यांच्या घराचा आकार अन् मनाचा विस्तारही जनसागराप्रमाणेच असल्याची विशाल भावना ते व्यक्त करतात. यंत्रवत आयुष्याला सौंदर्याचा अभिनव मंत्र मिळाल्यावर विसंवादाला टाळून सुसंवादाचे आवाहन करतात. अनेक उपमा उत्प्रेक्षांसह नवनव्या प्रतिमा आणि प्रतिकांचा सढळ हस्ते वापर केलेला दिसत असला तरी कुठेही कृत्रिमता जाणवत नाही. कारण संपूर्ण चिंतनाला आध्यात्मिक पाया आहे. ‘सत्य बोलणे आपले वैभव आहे' या तत्त्वाशी प्रामाणिक अशी ही भावपूर्ण विचारांची शाब्दिक यात्रा अर्थपूर्ण आहे. एका राजीय नेत्याच्या वाटचालीतील हा काव्यमय टप्पा अतिशय हळुवारपणे वाचकांस आपलेसे करतो. म्हणून हा संग्रह मुक्तछंद असला तरी यात अंतर्गत प्रवाही लय आहे. ‘अमेय'ची उत्कृष्ट निर्मिती म्हणून उल्हास लाटकर या प्रकाशकांचे कौतुक करायला हवे. 66 कवितांची ही यात्रा संपूच नये असे वाचकांस मनोमन वाटते. यात सर्व आले! श्वेताली साठ्ये

माझे सैनिक माझा लढा

शिवाजी महाराजांच्या आदर्शामुळेच उत्तुंग यश

दै. तरुण भारत, बेळगाव, मंगळवार दि. 11 जून 2013
निवृत्त लष्करप्रमुख जे. जे. सिंग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ‘छ.शिवाजी महाराज यांची शिकवण माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. उत्कृष्ट प्रशासक, सक्षम योदधा आणि समर्थ राजा यांचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपण वाटचाल केली. त्यांच्या गनिमी काव्याचा वापर केला. यामुळेच इतके उत्तुंग यश मिळाले.’असे उद्गार माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जे. जे. सिंग यांनी काढले. 'ए सॉल्जर्स जनरल : 'अॅन ऑटोबायोग्राफी’ या त्यांच्या पुस्तकाचा 'माझे सैनिक माझा लढा' या नावाने मराठीत अनुवाद करण्यात आला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी पार पडला. पुस्तकांचे प्रकाशन करताना सिंग बोलत होते. येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या यशवंत घाडगे सभागृहात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे कमांडंट ब्रिगेडियर संतोष कुरुप आणि पुस्तकाचे प्रकाशक पुण्याच्या अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर होते. 'माझे सैनिक माझा लढा' या पुस्तकातून आमचे सैनिक देश व देशवासियांच्या रक्षणासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहेत, हे सांगू इच्छितो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास पूर्णपणे सज्ज आहेत. शिपाईपासून लष्करप्रमुख पदापर्यंत झालेली वाटचाल, त्यासाठी करावी लागलेली मेहनत, चढ-उतार याची समग्र माहिती या पुस्तकात असल्याचे सिंग यांनी सांगितले. सैतान सिंग असे नामकरण - जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अतिरेक्यांविरोधात आपण कठोर कारवाई केली. दोन वर्षांत सुमारे 165 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. यामुळे त्यांच्याकडून आपले 'सैतान सिंग' असे नामकरण झाले होते, असेही जे. जे. सिंग यांनी यावेळी सांगितले. मराठी माणसे खूप आवडतात माझे आजोबा 1914 मध्ये सैन्यात भरती झाले. जागतिक युद्धात त्यांनी भाग घेतला. पंजाब व मराठा बटालियन यांचा संबंध आला आणि माझे नाते मराठा बटालियनशी आजोबांनी जोडले. 'मराठा बडे तगडे और बहाद्दूर होते है' असे आजोबांनी त्यावेळी सांगितले होते. मलाही मराठी माणसं खूप आवडतात. लग्नही मराठी मुलीशी (रोहिणी) पुण्यात झाले. मराठी माणसांबरोबर 50 वर्षे राहून आपली मराठी संस्कृती, परंपरा, नाट्य, साहित्य, पोवाडे यांच्याशी नाळ जोडली गेली आहे. माझ्या कुटुंबाने देशसेवेचे एक शतक पूर्ण केले असून मला देशाचे नेतृत्व करण्याचे भाग्य मिळाले. यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले. आयुष्यातील अनेक चढ-उतार पार करीत. आपण हे यश मिळविले आहे. 1914 ते 2013 या काळात जगात अनेक बदल घडले. मात्र सैनिकांच्या मनातील देशभक्ती, शिस्त आणि देशरक्षणाची सदैव तयारी यात किंचितही बदल झाला नाही. याचा मला अभिमान आहे. माझ्या योगदानात मराठा लाईट इन्फंट्रीचे भरपूर योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. माझ्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. विजया देव आणि अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनाही त्यांनी धन्यवाद दिले. या पुस्तकात ‘फौजी मराठी नसून अस्सल मराठी’ आहे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुस्तक वाचावे, असे आवाहन त्यांनी केले. 1964 मध्ये येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तसेच या पुढेही या सेंटरचा झेंडा नेहमीच उंचावर फडकणार असल्याचा विश्र्वास व्यक्त केला. कर्नल राजीव यांनी स्वागत केले. ब्रिगेडियर संतोष कुरुप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजया देव यांनी पुस्तकातील काही भागांचे वाचन केले. सीमेवरील जवान सक्षम - पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी देशाच्या सीमारेषेवर आपले जवान कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. देशाच्या संरक्षणासाठी आपले सैनिक सक्षम आहेत. शांततेच्या मार्गाने समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.