गाथा सरसेनापतीची : एक वेधक आत्मकथन !

दै. तरुण भारत, 9 मे 2013
भारताचे भूतपूर्व लष्करप्रमुख व सध्या अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले जनरल जोगिंदर जसवंत सिंग यांच्या ‘ए सोल्जर्स जनरल ऍन आटोबायोग्राफी' या मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘माझे सैनिक- माझा लढा :गाथा सरसेनापतीची' या नावाने पुण्याच्या अमेय प्रकाशनने प्रसिद्ध केला असून, डॉ. विजया देव यांनी ही मराठीकरणाची जबाबदारी यशस्वी पार पाडली आहे. जनरल सिंग यांचे हे आत्मवृत्त वाचनीय, वेधक व गेल्या 50 वर्षांतील भारतीय इतिहासाच्या अनेक सुवर्णक्षणांचे साक्षीदार असे प्रामाणिक कथन आहे. कारण, या रंजक निवेदनातून लष्कराची परंपरा, पंजाबची संस्कृती, काश्मीरसमस्या, पूर्वांचलातील दहशतवाद, राजकारणातील डावपेच याचेच दर्शन होते असे नव्हे, तर परराष्ट्र संबंधाचे वस्तुनिष्ठ विश्लेषणही त्यांनी समर्थपणे मांडले आहे. त्यामुळे जनरल सिंग यांच्या जीवनातील हा अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा लेखाजोखा, इतरांनी घ्यावी एवढा मौलिक आणि मार्गदर्शक दस्तावेज झाला आहे. जनरल सिंग यांचे आजोबा लष्करात शिपाई होते. ‘शिपाई दा बेटा कर्नेल अने कर्नेल दा बेटा जनरल बनेगा,' हे त्यांच्या आजोबांचे भाकीत व आंतरिक तळमळ अक्षरश: खरी ठरली. आजोबा आत्मसिंग यांनी पंजाब रेजिमेंटमधून पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता. वडील जे. एम. मारवा दुसरे महायुद्ध व पुढे स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भारत-पाक युद्धात लेफ्टनंट कर्नल म्हणून सहभागी झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी जे. जे. सिंग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले व आपल्या अतुलनीय कर्तबगारीने लष्करप्रमुख पदापर्यंत पोचले. निवृत्तीनंतर त्यांची अरुणाचलचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. या 50 वर्षांच्या अलौकिक वाटचालीचा मन मुग्ध करणारा आलेख या ग्रंथाचा स्थायीभाव आहे. या आत्मनिवेदनात आत्मस्तुती नाही, तर येणारी आव्हाने स्वीकारत पुढे जाणाऱ्या सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची ही गाथा आहे. जनरल सिंग यांनी साडेचारशे पानांच्या या प्रदीर्घ कथनात, त्यांना लष्करात काम करताना आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. भारताचे ते पहिले शीख लष्करप्रमुख होते. मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधून त्यांनी कारकीर्दीला प्रारंभ केल्यामुळे, मराठीचा व मराठ्यांचा त्यांना विशेष अभिमान आहे. आपल्या चार दशकांच्या लष्करी वाटचालीत त्यांनी दोन पायदळ बटालियनचे नेतृत्व केले. कारगील युद्धाचे नियोजन व कार्यवाही यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1999 च्या मे महिन्यात पाकिस्तानच्या आक्रमणानंतर कारगिलमध्ये जे युद्ध झाले, त्या वेळी जे. जे. सिंग लष्कर मुख्यालयाच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टोरेटमध्ये एडीजीएमओ या पदावर होते. श्रीनगर मुख्यालयातून 8-9 मे रोजी पहिला अहवाल मिळाल्यानंतर, भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे इत्थंभूत वर्णन यात रेखाटण्यात आले आहे. कारण, या मोहिमेला दिशा देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत सिंग केवळ आघाडीवरच नव्हते, तर लष्कराचा प्रवक्ता म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पडली होती. या युद्धात भारतीय लष्कराने अपार पराक्रम गाजविला. पाकिस्तानची अविचारी योजना व कारगिलचे आव्हान या विषयावर सिंग यांनी मांडलेली भूमिका परखड आणि भारत-पाक संबंधाबाबत बरेच काही सांगणारी आहे. काश्मीरमध्ये ब्रिगेड कमांडर असताना त्यांनी तेथील गावकऱ्यांशी संवाद साधण्याचे अनोखे धोरण स्वीकारले. लष्कराचा अधिक मानवतावादी चेहरा जनतेपुढे यावा, यासाठी त्यांनी जिवापाड प्रयत्न कले. दहशतवादी जनतेची कशी दिशाभूल करीत आहेत, हे स्थानिक जनतेला समजावून सांगण्यासाठी त्यांनी मोहीमच उघडली होती. ‘पोलादी मूठ व मखमली मोजा' या योजनेचे ते जनक होते. लष्कराने काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन केल्याशिवाय दहशतवादाला आळा बसू शकणार नाही. हे त्यांनी हेरले होते व त्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. ही त्यांची धडपड वाचकांना अंतर्मुख करणारी आहे. 2005 साली सिंग लष्करप्रमुख झाले. त्याच वर्षी काश्मीरमध्ये हिम त्सुनामी आली व नंतर भूकंपानेही तडाखा दिला. तेव्हा लष्कराने मदतीसाठी जो हात पुढे केला, त्यावर काश्मिरी जनतेने लष्कर व वायुसेनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच, त्यासोबत एरव्ही बोचरी टीका करणाऱ्या स्थानिक प्रसिद्धिमाध्यमांनीही स्तुतीचा वर्षाव केला आणि ‘आम्ही देवदूत बनलो,' असा अनुभवही सिंग यांनी सांगितला आहे. मुशर्रफ यांच्या, कारगिलमधील अविचारी धाडसावर भाष्य करताना सिंग यांनी पाकिस्तानसमोर उभ्या असलेल्या भेसूर आव्हानावर आपली भूमिका मोकळेपणाने लिहिली आहे. कारगिल प्रकरणातून सहीसलामत पाक लष्कराला बाहेर पडता यावे म्हणून अमेरिकेने कशी मदत केली, यासाठी अमेरिकन लेखक बूस रिडेन यांच्या विधानाचा हवाला त्यांनी दिला आहे. ओसामा बिन लादेन प्रकरणाचाही यात उल्लेख आहे. टाईम मॅगझिनने 13 मे 2011 रोजी सिरील अल्मेडा या प्रसिद्ध पाकिस्तानी लेखकाचा एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यात तो म्हणतो, ‘ओसामा पाकिस्तानात आहे, हे आपल्याला माहीत नसेल तर आपण अपयशी राष्ट्र आहोत व हे आपल्याला माहीत असेल, तर आपण बदमाश राष्ट्र आहोत.‘ मुशर्रफ यांच्या राजवटीने कोणता वारसा मागे ठेवला, याचे हे एक उदाहरण होय, याकडेही सिंग यांनी लक्ष वेधले आहे. भारत-चीन संबंधावर सिंग यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. या दोन देशांत युद्ध होईल. असं भाकीत बरेच तत्त्ववेते करीत असतात. त्यांचा परमार्श घेताना सिंग म्हणतात, ‘या विश्लेषकांनी दोन्ही बाजूंचा हिमालय पाहिलेला नाही. अशा प्रदेशात युद्ध काय चीज असते, याची कल्पना येण्यासाठी बर्फ आणि हिमवादळ असणारा हिवाळा अनुभवायला हवा. आता युद्ध जिंकण्याची खात्री असल्ययाशिवाय आधुनिक युद्ध लढले जाणार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे.‘ अण्वस्त्रयुद्ध हा तर मूर्खपणाचा कळस ठरेल, असा अभिप्राय नोंदविताना, याचा अर्थ आपण गाफील राहावे असा मुळीच नव्हे, हे त्यांनी ठामपणे प्रतिपादित केले आहे. सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण कशा पद्धतीने व्हावे, याबाबतही त्यांनी सविस्तर भूमिका माडंली आहे. तामीळ लोकांच्या ऐतिहासिक संबंधामुळे श्रीलंका व भारत यांच्यातील गुंतागुंतीचे नाते, बांगला देशातील झालेले करार आणि त्याचा ईशान्येकडील राज्यांना मिळालेला फायदा म्यानमारसोबत असलेली 1640 किलोमीटर लांब जंगली सीमा, सिंगापूरचे लष्कर व भारताचे लष्कर यांचे सहकार्य आणि संयुक्त प्रशिक्षण... अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह सिंग यांच्या या आत्मनिवेदनातून झाला असल्याने, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही मोठी उपलब्धी मानायला हवी. भूतपूर्व लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या वयावरून जो गदारोळ उठला, त्याचाही सविस्तर उल्लेख यात आहे. ‘या चर्चेत माझ्या नावाचा उल्लेख झाल्याने व त्यावेळी मी लष्करप्रमुख असल्याने या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक वाटते.‘ असे जे. जे. सिंग यांनी स्पष्ट केले आहे. 2006 मध्ये ही वयाची तफावत संरक्षण मंत्रालयाने निदर्शनास आणली. तेव्हा व्ही. के. सिंग यांनी 1951 हे जन्मवर्ष मानले जावे, असा दावा केला. कागदपत्रांची छाननी केल्यावर, इतक्या उशिराच्या टप्प्यावर या विनंतीवर कार्यवाही शक्य नाही, असे त्यांना कळविण्यात आले. व्ही. के. सिंग यांचा माझ्याशी भेट, पत्रव्यवहार कधीच झाला नाही, असे स्पष्ट करून जे. जे. सिंग म्हणतात, ‘ही तक्रार त्या वेळी लष्कर मंत्रालयात वा लष्कर मुख्यालयात घेऊन जायला ते मोकळे होते. त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा त्या वेळी का केला नाही, हे कळत नाही.‘ व्ही. के. सिंग यांची लष्कर मुख्यालयाबद्दलही नाराजी आणि या दुर्दैवी वादंगावर आपण संयमपूर्वक पाळलेले मौन, याचाही खुलासा जे. जे. सिंग यांनी या आत्मकथनातून सविस्तर केला आहे. सैनिकांचे गिर्यारोहण व क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन या विषयावर लिहिताना काही वेधक आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. जे. जे,. सिंग यांचे वडील कंपनी कमांडर असताना सिकंदराबादच्या ईएमई सेंटरमध्ये मिल्खासिंग उमेदवार म्हणून दाखल झाले होते. त्यावेळची आठवण सांगताना जे. जे. सिंग म्हणतात, ‘माझ्या वडिलांना मिल्खामधील अॅथलिस्ट गवसला. त्यांनी मुलाप्रमाणे त्यांचे संगोपन केले. स्टेशन क्रीडा स्पर्धेत त्याला धावताना पाहून आमचे भान हरपत असे. पुढे त्याने रोम ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडविला.‘ अशा भूतकाळाच्या हिंदोळ्यावर झुलताना जीवनाचे तत्त्वज्ञानही त्यांनी अनुभवातून अधोरेखित केले आहे. ‘माणसाने आपल्या आनंदाची व्याख्या बदलावी, आकांक्षांना लक्ष्मणरेषा घालावी, पण प्रामाणिक प्रयत्नांची कास मात्र सोडू नये,‘ हा त्यांचा यशाचा मूलमंत्रही लक्षात घेण्यासारखा आहे. सैनिकांच्या, नाविकांच्या वा हवाई योद्ध्यांच्या सन्मानार्थ कोणतेही राष्ट्रीय युद्धस्मारक या देशात नाही, असे उचित स्मारक व्हावे, अशी अपेक्षा सिंग यांनी आग्रहपूर्वक मांडली आहे. त्यासाठी योग्य स्थळही त्यांनी सुचविले आहे. राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात असे स्मारक व्हावे. गरज पडल्यास राजपथ लॉन्सच्या खाली जमिनीच्या पोटात ते उभारता येईल ऑस्ट्रेलियात असे म्युझियम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. शूरवीरांचे यथोचित स्मारक इतर बलशाली देशांप्रमाणे आपल्या देशातही व्हावे, ही त्यांची मागणी गैरवाजवी आहे असे सामान्य माणसालाही वाटणार नाही. कल्पकता, नावीन्य व शोध यांना प्रेरणा मिळावी म्हणून सिंग लष्करप्रमुख असताना त्यांनी ‘ड्रीमर्स क्लब' सुरू केला. प्रत्येकाला सुचलेल्या चांगल्या कल्पना त्यांच्या कार्यालयात पाठविण्याची संधी दिली. त्यातून अनेक चांगले उपक्रम सुरू होऊ शकले. ही त्यांची धडपडही जगावेगळी होती. अल्पसंख्यांकांच्या विकासाला चालना देण्यासाठी न्या. सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली एक सात सदस्यीय समिती सर्वेक्षण करीत होती. या समितीच्या संदर्भात लष्करप्रमुख म्हणून सिंग यांनी जी भूमिका घेतली, ती बहुतांश राष्ट्रीय वृत्तपत्रांनी उचलून धरली व पुढे सरकारनेही हा दृष्टिकोन स्वीकारला. हा दूरगामी परिणाम करणारा घटनाक्रम अनेकांना ज्ञातही नसेल. काळाच्या ओघात स्मृतीच्या पटलावरून विस्मरणात जाणाऱ्या अशा आठवणींना या पुस्तकातून उजाळा मिळाला आहे. गेल्या 50 वर्षांतील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा संदर्भ यात असल्याने लेखनाचा ताजेपणा जाणवत राहतो. काश्मीर व पूर्वांचल राज्यात सैनिकांना कशा परिस्थितीला तोंड द्यावे लागते, याचा चित्तथरारक अनुभव या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. जे. जे. सिंग यांच्यावर 1992 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे वर्णनही हृदयाचा ठोका चुकविणारे आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना क्लिष्ट भाषा टाळता आली असती, तर रसाळपणा आणखी वाढला असता, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. शशिकुमार भगत

निडर सैनिकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास

दै. लोकसत्ता, लोकरंग, रविवार, 16 मार्च 2014
लता दाभोळकर प्राणांची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक, हे प्रत्येक भारतीयांसाठी आदरणीयच. अशाच एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारं पुस्तक म्हणजे जनरल जे. जे. सिंग यांचं ‘माझे सैनिक माझा लढा'. जोगिंदर जयवंत सिंग यांच्या घराण्यात लष्कराची परंपरा. भारतातील ते पहिले शीख लष्करप्रमुख. दोन पायदळ बटालियनचं नेतृत्व. कारगिल युद्धाचं नियोजन आणि अंमलबजावणी यात सहभाग... अशी थोडीथोडकी नव्हे तर सत्तेचाळीस वर्षांची लष्करातील कारकीर्द़ ! लष्करात असताना भारतीय सीमांच्या रक्षणाबरोबरच लष्कराला मानवतावादी चेहरा देण्यात आणि तो चेहरा लोकांपुढे येण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहिले. लष्कर आणि सामान्य लोक यांच्यातील दरी कमी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. हा जीवन प्रवास सहा भागांमध्ये विखुरला आहे. त्यात ‘घराण्याचा वारसा आणि पूर्वायुष्य', ‘कॅडेल ते कर्नल', ‘फ्लॅग रॅंक : ‘वनस्टार'कडून सी-इन-सीकडे', ‘सर्वोच्च शिखर', ‘राज्यपाल :अरुणाचल प्रदेश' आणि सहावा भाग आपल्या आयुष्यावर टाकलेला ‘दृष्टिक्षेप-विचारमंथन' सुरुवातीला आपले पूर्वज, त्यांची लष्करातील उल्लेखनीय कामगिरी आणि त्याचा असेलला अभिमान याविषयी लेखक भरभरून सांगतात. त्यांच्या शब्दाशब्दांमध्ये आपल्या कुटुंबातील लष्करी परंपरेचा अभिमान दिसून येतो. आजोबांनी दिलेल्या लढ्यांविषयी ते भरभरून सांगतात. त्यांचं ‘मरहट्टा' बटालियनशी असलेलं नातं आणि त्याच बटालियनचं प्रमुखपद भूषवण्याचा मिळालेला मान हे त्यांना काळाचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आजोबांनी त्यांना दिलेला ‘चांगले नेते आदर कमावतात, आदर कमवावा लागतो, तो मागून मिळत नाही,' हा संदेश त्यांनी सदैव मनाशी जपला आणि त्याच दिशेने आपल्या लष्करी आयुष्याची वाटचाल ठेवली. एक सैनिक म्हणून झालेली जडणघडण सांगताना ते म्हणतात, ‘पंजाबी' बाणा आणि ‘शीख' असणं हा माझा वारसा आहे आणि शीख पंथाच्या सामुहिक चेतनेनं तो मला बहाल केलेला आहे.' लष्कराच्या बहुजिनसी, धर्मातीत आणि सर्वसमावेशक लष्करी वातावरणात सिंग लहानाचे मोठे झाले. याच संस्काराची शिदोरी घेऊन त्यांनी पुढील आयुष्याची वाटचाल केली, हे प्रकर्षाने जाणवते. शीख धर्मातील स्त्री-पुरुष समानता, वर्गहीन आणि समन्वयवादी भूमिका हा संस्कारही त्यांच्यात रुजलेला आहे आणि त्याचीच कास धरून त्यांनी लष्करातील सेवा अभिमानास्पदपणे पूर्ण केली. यामुळेच ते लष्कराला मानवतावादी चेहरा देण्यात यशस्वी झाले असावेत. आपल्या धारदार व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली याविषयी सांगताना, त्यांच्यातील अभ्यासू, स्वतःला सतत घडवण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. लष्करी सेवेत असताना रेलिमेंटल सोल्जरिंग, अल्जिरियामधील कामगिरी आणि त्यासाठी लागणारे विशेष कौशल्य, ऑपरेशन माऊसट्रॅप, हुशारीने आखलेल्या मोहिमा, सियाचीनमधील युद्धसज्जता यांविषयी वाचताना सिंग यांच्यातील बुद्धिचातुर्य आणि कामातील अचूकता हे गुण प्रकर्षाने जाणवतात. कारगिल युद्धाविषयी लिहिताना पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि काश्मीरमध्ये आणि त्या अनुषंगाने भारताला अस्थिर करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे यांवर ते प्रकाश टाकतात. कारगिलमध्ये भारताच्या भूमीत सत्याहत्तर दिवस घालवलेल्या एका पाकिस्तानी सैनिकाचा स्वानुभव त्यांनी कथन कला आहे. ते वाचून पाकिस्तानचा दुटप्पीपणा प्रकर्षाने जाणवतो. भारतीय सैनिकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी वाचताना त्यांनी लष्कर, नौसेना आणि वायुसेना यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सहभागाला त्यांनी उजाळा दिला आहे. हे आत्मचरित्र वाचताना सिंग यांनी काश्मीरमध्ये बजावलेली महत्त्वाची भूमिका विशेष करून लक्षात राहते. दहशतवाद्यांशी कलेला सामना तसेच भारतीय सीमांचं रक्षण करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही महत्त्वाची भूमिका कशा प्रकारे पार पाडावी लागते आणि ते ती यशस्वीपणे पार पाडतात, हे वाचताना या दोन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ साधण्याचं कौशल्य कौतुकास्पद वाटतं. ‘मूशर्रफ आणि मी' या प्रकरणात त्यांनी आपला जन्म, स्थळ या संदर्भात मुशर्रफ यांच्याशी असलेलं साधर्म्य स्पष्ट करताना या माणसाला मनात भेटण्याची इच्छा असतानाही शेवटी एका खोटारड्या आणि आपल्या देशावर वक्र नजर टेवणाऱ्या माणसाशी भेटणं नकोच, या विचारापर्यंत ते पोहोचतात. एक लष्करप्रमुख म्हणून भूमिका बजावताना संरक्षण, राजनीती आणि शेजारील राष्ट्र यांच्यात समन्वय आणि कठोर धोरण यांचा मेळ साधण्यात सिंग यशस्वी झाले. याविषयी वाचताना सिंग यांची सडेतोड विचारबुद्धी आणि त्यामागचा त्यांचा अभ्यास याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या आत्मचरित्रात आपल्या कुटुंबाविषयी असलेलं त्यांचं प्रेम हळुवारपणे त्यांनी उलगडलं आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी केलेलं उल्लेखनीय कामही लक्षात राहतं. विचारमंथन या शेवटच्या प्रकरणातून त्यांच्यातील निर्भीड माणूस, अध्यात्मावर स्वतःचं मुक्तचिंतन मांडणारी व्यक्ती, हे आत्मचरित्र वाचताना त्यांच्याविषयी प्रचलित असलेल्या ‘शस्त्र आणि शब्द या दोन्हींचा मारा करणारा लष्करप्रमुख', ‘मऊ मेणाहुनी...', भारतीय लष्कराच्या तत्त्वप्रणालीचा शिल्पकार' या विशेषांची सत्यता पटते. शेवटी मांडलेल्या छायाचित्रांवरूनही त्यांनी बजावलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची कल्पना येते. लष्करी परंपरा असलेल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, सरळमार्गी सैनिकाचा अत्युच्च पदापर्यंतचा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरतो. ‘माझे सैनिक माझा लढा' - जनरल जे. जे. सिंग, मराठी अनुवाद : डॉ. विजय देव, अमेय प्रकाशन, पुणे. पृष्ठे - 484, मूल्य - 595 रुपये.

युगान्त

बाळासाहेब हिंदूंच्या असंतोषाचे जनक

दै. सामना, पुणे शनिवार 19 जानेवारी 2013
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो याची पर्वा न करता आपली भूमिका ठामपणे मांडणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. लोकमान्य टिळक हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे जनक होते, पण बाळासाहेब हे खऱ्या अर्थाने हिंदूंच्या असंतोषाचे जनक होते. त्यांनी दिलेले विचारच पुढील पिढीला दिशादर्शक ठरतील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. ते कालपुरुष होते : दाजी पणशीकर आज 14 वर्षे झाली. 'सामना'त अखंडपणे मी लिहीत असून आतापर्यंत 540 लेख लिहिले यापाठी बाळासाहेबांची प्रेरणा आहे. त्यांच्यामुळेच मी लिहिता झालो. हे सांगताना 'रामायण-महाभारता'चे अभ्यासक दाजी पणशीकर यांनी बाळासाहेबांची आठवण सांगितली. ते म्हणाले, 1966 साली स्वातंत्र्यवीर सावरकर गेले. त्यांची अंत्ययात्रा दादरहून चंदनवाडीच्या दिशेने निघाली. मात्र या अंत्ययात्रेत एकही कॉंग्रेसचा नेता नव्हता. पण बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला झाडून साऱ्या पक्षांचे नेते होते. सावरकरांच्या वेळी जे 'पाप' त्यांच्या हातून घडले होते त्यामुळे बाळासाहेबांच्या अंत्यविधीच्या वेळेला ते मान खाली घालून होते असे पणशीकर म्हणाले. फोटो ओळी -'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या 'युगान्त'या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ज्वलंत लेखनखंडाचे प्रकाशन शुक्रवारी झाले. यावेळी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, रामायण-महाभारताचे अभ्यासक दाजी पणशीकर, दै. 'केसरी'चे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर आणि प्रकाशक उल्हास लाटकर उपस्थित होते. 'युगान्त'चा दिमाखदार प्रकाशन सोहळा.

मग अंगार फुलणारच

दै. लोकसत्ता, लोकरंग, रविवार, 6 जानेवारी 2013
कम्युनिस्टांचा सर्वांत जास्त सत्ताकाल असलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय पटलावर ममता बॅनर्जी या नव्या नेतृत्वाचा उदय झाला आणि त्यांच्या झंझावाती नेतृत्वामुळ तिथे बदलाचे वारे वाहू लागले. पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या संघर्षमय दिवसांची टिपणे, जीवनातील अनेक नाट्यपूर्ण प्रसंग आणि आठवणी ‘मॉं... माटी... मानुष...' या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्याचा अनुवाद ‘अमेय प्रकाशन'तर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश- सन 2006 आणि 2007 या वर्षांत काय काय घडलं? कोणत्या दिव्यातून जावं लागलं, याचा मी विचार करत होते. आम्ही जे अनुभव घेतले. त्यामुळे आमच्यातील सद्सद्विवेक बुद्धी जागी झाली. एक प्रकारे या ‘बंदबुद्धी'च्या दाराला धक्के मारल्यासारखंच हे होतं. कमालीची क्रूरता, र्क्रौय, निर्ममता यांच्याविरुद्ध आतापर्यंत मनात खोलवर दडलेला आवाज, जोरकसपणे बाहेर आला होता. आता बंडखोरीचा रस्ता पकडण्याची गरज होती. दबून, दडपून चालणार नाही. त्रासाचा, सोसण्याचा काळ आता मागे टाकणे आवश्यक होतं. इतिहासात थोडं डोकावून पाहिलं आणि विचार केला तर स्पष्ट होतं. भव्यदिव्य दृष्टिकोन ठेवला नाही, तर काहीच घडत नाही. मग आता गतस्मृतींमध्ये रंजन करण्यात काय अर्थ? जीवन म्हणजे रोज श्वास घेत जगत राहणं नक्कीच नाही, तर आत्मसन्मानाने तुमचं मस्तक उंच राहिलं पाहिजे. खाली मान घालून जगण्याला कसला अर्थ आहे ? जे लोक आपलं आयुष्य् रडत-रडत घालवतात आणि मृत्यू यावा, म्हणून प्रार्थना करतात त्यांना संघर्ष ठाऊकच नसतो. लढणं माहीत नसतं. श्वास चालू आहे अन् हृदयाची धडधड चालू आहे म्हणजे तुम्ही जिवंत असता. पण रडणं, खालमानेनं जगणं खरं नसतं, असं जगणं मृत्युइतकंच वाईट आहे. तुम्ही जगण्यातला खरा अर्थ शोधला पाहिजे. आयुष्याचं मोल तुम्हाला समजलं पाहिजे. झगडून, संघर्ष करून आयुष्याला नवं परिमाण, मूल्य मिळवून दिलं पाहिजे. मरणाची भीती कसली बाळगायची? मरणाच्या भीतीवर विजय मिळवणं, हेच तर खरं जगणं आहे. त्याच वेळी तुम्ही खरे अजिंक्य असता. ‘तुम्ही इतके दिवस उपोषण कसं करू शकला?‘ असा प्रश्न मला अनेकांनी विचारला आहे. आमचा ‘सत्याग्रह होता किंवा सत्यासाठी उपवास होता,' याची कोणालाही कल्पना नसते. त्यामुळे 26 दिवस उपोषण होऊ शकलं. लोकशाहीवादी देशाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी, उपवास हा एक अतिशय शांततापूर्ण लोकशाहीवादी मार्ग आहे. गोरगरीब, जनतेची होणारी पिळवणूक, त्यांचे प्रश्न, समस्या, त्यांना दिली जाणारी निर्दयी वागणूक, त्यांचे अश्रू, यातना यांमुळे माझ्या मनाला खूप वेदना होत. त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असा विचार करून मी स्वस्थ बसले नाही. शक्य असेल ते शक्य तेव्हा सगळं काही केलं. त्यामुळे मला त्याचा न्याय कधी ना कधी नक्की मिळेल, असं वाटलं. पण प्रत्यक्षात मलाही न्याय नाकारला गेला. ‘न्यायासाठी तू कशाला इकडे-तिकडे पाहतेस, तो तुला कधीच मिळणार नाही. ज्या लोकांसाठी तू काम केलंस, त्यांच्याकडूनही नाही,‘ असं माझं दुसरं मन म्हणत होतं... पण तरीही मी लढले, उपोषण केलंच! अशी परिस्थिती एकदम कशी बदलली? माझा निर्णय कसा आणि का बदलला? नेमक्या कोणत्या घटनेनं मला पूर्ण बदलवलं? मला वाटतं, या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याची गरज आहे. मी काय केलं, कसं केलं, हे सविस्तर सांगण्याची आज आवश्यकता वाटतेय. ज्यांच्यावर सतत अन्याय होतो, ज्यांची पिळवणूक होते. त्यांना संघर्ष करण्यीच इच्छा तर असतेच. न्यायाची तृष्णा त्यांना लागलेली असते आणि त्यामुळेच आता काहीही झालं तरी चालेल, पण हा संघर्ष थांबवायचा नाही, अशी खूणगाठ बांधून ते मार्गक्रमण करत असतात. एक प्रकारे न परतीची वाट त्यांनी धरलेली असते. त्यांच्या मनात अपमानाचा ज्वालामुखी खदखदत असतो. आता असे धगधगते विचार मनात घेऊन कोणी कसं शांतपणे मागच्या बाकावर बसू शकेल? मनात विचारांचा आगडोंब उसळलेला असताना निष्क्रिय, कोणतीही प्रतिक्रिया न देता गप्प बसताच येत नाही आणि जर कोणी असं गप्प बसत असेल तर माझ्या मते तो पळपुटेपणा झाला. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे प्रश्न पडतात, त्यांना उत्तरंच नसतात. मानवी हक्काचं मूल्य जाणून घेण्याची आपल्याला गरज नाही, असा याचा अर्थ होतो का? ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, त्यांनी मनात आलं, म्हणून पैसा-शक्तीच्या जोरावर गरिबांच्या झोपडीवर बुलडोझर चालवायचा का? कोट्यवधी लोकांनी असहाय होऊन हे स्वस्थपणे पाहायचं का? त्यांचीही काही स्वप्नं असतील. काही आशा, आकांक्षा असतील त्यांचा चुराडा होऊ द्यायचा का? आता या लोकांनी विरोध केला तर त्यांना श्रीमंत लोक आपल्या शक्तीने, पैशाने शांत करणार. एक प्रकारे ‘पॉवर थेरपी' त्यांच्यासाठी वापरणार. बाहुबलींनी गरिबांना जमिनीत गाडलं तरी कसलाही प्रतिकार करायचा नाही. अशा वातावरणात या गरिबांचं जीवन अगदीच कष्टमय होऊन जातं. दुसऱ्याचं आयुष्य असं दुःखद बनवावं की, तुम्ही शपथ घेऊन त्याचं पालन करावं, असं काही घटनेत नोंदवलेलं नाही. म्हणजे केवळ सत्ता आहे, म्हणून तुम्ही हे करता, याचा अर्थ, तुम्ही घटनेचा, कायद्याचाही अनादर करता. एकाच समाजात राहून इतकं स्वार्थी तुम्ही कसं बनू शकता? हे सगळं मी तरी अजिबात सहजपणे स्वीकारू शकत नाही कोणाचं तरी जीवन उद्ध्वस्त करून, त्यांच्या आशा-आकांक्षांना पायदळी तुडवून, त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून रक्तरंजित झालेल्या जमिनीवर काहीही उभं करून विकास होऊ शकतो, हे मान्य करण्यास माझं मन अजिबात तयार नाही. सुदैवाने आपल्या समाजात फक्त स्वार्थी, स्वतःची तुंबडी भरणारी मंडळी नाहीत. मृत्यूला अजिबात न घाबरणारी मंडळीही आहेत. ‘जन्म-मृत्यू' हे त्यांच्या दृष्टीने फक्त शब्द आहेत. जीवन कसं जगायचं, हे त्यांना खऱ्या अर्थाने समजलं आहे. आपल्या देशातच नाही, तर परदेशातही अशी उत्तुंग माणसं आहेत. निःस्वार्थ भावनेने कार्य करणारी ही मंडळी म्हणजे आशेची छोटी-छोटी रोपटीच आहेत आणि या मंडळींमुळेच विरोधकांचा आवाज कधीच शांत होणार नाही. होऊ दिला जाणार नाही. बंगालमध्ये माझा जन्म झाला, याचा मला कायमच अभिमान वाटतो. या संपूर्ण जगामध्ये मानवी वसाहती वसायला प्रारंभ झाला त्या काळापासून हा भूप्रदेश संपन्न बनतोय आणि वृद्धीचा मीसुद्धा एक भाग आहे, असा विचार मला खूप खूप समाधान देतो. आजूबाजूला पाहिलं, की माझे तणाव, माझी उदासी कुठल्या कुठे पळून जाते. खऱ्या अर्थाने माझा जीव इथेच रमतो. पण या आयुष्यालाही दुःखाची किनार आहे. काही वेळेस ती खूपच गडद होते. कधी बरं? संस्कृती आणि सुशिक्षितपणा विषाच्या पुरामध्ये वाहून जातात, त्या वेळी मला खूप यातना होतात. माझ्या प्रिय राज्यात लोकशाही पायदळी तुडवली जाते, त्यावेळी भयंकर वेदना होतात. गरीब, कष्टकरी जनतेकडून त्यांचे मूलभूत हक्क- अधिकार हिरावून घेतले जातात, त्या वेळी मला खूप त्रास होतो. मग आता मला सांगा, हे सगळं होत असताना मी विरोध करायचा नाही का? कसं गप्प बसायचं?